Plastic Ban : पुण्यात ‘पन्नी’चा धिंगाणा! धुलीवंदनानंतर कचऱ्यात प्लास्टिकचा खच; महापालिकेचे दुर्लक्ष
Plastic Ban : बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा बेसुमार वापर; पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेजमध्ये अडथळे निर्माण होण्याची भीती.

Plastic Ban – शहरात ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या विक्रीला बंदी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रंगपंचमी, धुलीवंदन, तसेच अनेक देशी दारूंच्या दुकानांच्या परिसरात राजरोसपणे विक्री सुरू आहे. अतिशय पातळ असलेल्या या पिशव्या पर्यावरण, तसेच महापालिकेच्या ड्रेनेज आणि पावसाळी वाहिन्यांसाठी धोक्याची घंटा बनल्या आहेत.
शहराच्या अनेक भागात मंगळवारी धुलीवंदनाच्या दिवशी रंगांच्या पिशव्या म्हणून या पन्नीचा बेसुमार वापर करण्यात आला असल्याने कचऱ्यात त्याचे प्रमाण लक्षणीय स्वरूपात आढळून आले आहे. दुसरीकडे अशा प्रकारे बंदी असलेल्या प्लॅस्टिकची विक्री राजरोसपणे सुरू असताना महापालिका प्रशासनाला हे का दिसत नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
काय आहे पन्नी
ही पन्नी म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून बंदी असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या छोट्या पिशव्या आहेत. ज्या दुकानांमध्ये राजरोसपणे विकल्या जात आहेत. विशेषतः लहान मुले या पन्नी नावाच्या प्रकाराला बळी पडत आहेत. आई-वडिलांकडून दहा-वीस रुपये घेऊन पन्नास-पन्नास पन्नींची पाकिटे स्थानिक दुकानदारांकडून घेत आहेत.
धुलीवंदनादिवशी या पिशव्यांमध्ये रंगाचे पाणी भरून त्या एकमेकांवर टाकल्या जातात. रंगपंचमीच्या दिवशीही त्या वापरल्या जातात. याशिवाय शहराच्या काही भागात बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यांकडून या छोट्या पिशव्यांमध्ये ती भरून रस्त्याकडेला विकली जाते.
पर्यावरणाची हानी
या पिशव्या कचऱ्यात आल्यास त्या पर्यावरणास हानिकारक आहेत. अशा पिशव्यांचे विघटन होण्यासाठी जवळपास दीडशे वर्षे लागतात. त्यातच या पिशव्या एकत्र स्वरूपात पावसाळी वाहिन्या, ड्रेनेज वाहिन्यांमध्ये कचऱ्यासोबत आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होतात. कचऱ्यासोबत जाळल्यास हवेत विषारी वायूंचे प्रमाण वाढते.
“शहरात ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या असतील, तर त्याची तपासणी केली जाईल. ज्या दुकानदारांकडे त्या सापडतील, त्यांच्यावर दंडात्मक, तसेच जप्तीची कारवाई केली जाईल.”
– अविनाश सकपाळ, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन





