पावसाळ्यात ट्रेकिंगचा प्लॅन? ‘या’ टिप्स वाचा, मगच पायऱ्या चढा; ‘हे’ आहेत महाराष्ट्रातले भन्नाट ठिकाणं

monsoon। track । travel : पावसाळा म्हणजे हिरवाईची चाहूल, गड-किल्ल्यांची हाक आणि साहसाचा आनंद ! पावसात ट्रेकिंग करणं ही तरुणाईसाठी पर्वणी असते. मात्र निसर्गाच्या सान्निध्यात जाताना योग्य तयारी केली नाही, तर आनंदाचं रूपांतर त्रासात होऊ शकतं.
त्यामुळे पावसाळी ट्रेकसाठी कोणती काळजी घ्यावी आणि ट्रेकिंग आणखी चांगलं कसं होईल, यावर काही महत्त्वाच्या टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पावसात ट्रेकला जाताना घ्यावयाची काळजी:
1. योग्य पादत्राणे (शूज) निवडा:
चिखल आणि ओलसर रस्ता ओलांडताना चांगल्या ग्रिप असलेले वॉटरप्रूफ ट्रेकिंग शूज आवश्यक असतात.
2. रेनकोट आणि वॉटरप्रूफ बॅग:
छत्रीपेक्षा हलकासा आणि मजबूत रेनकोट अधिक उपयुक्त होईल. मोबाईल, ओळखपत्र, पैसे इ. वस्तूंसाठी वॉटरप्रूफ बॅग किंवा पाउच सोबत घ्या.
3. प्राथमिक औषधांची किट:
किरकोळ दुखापतींसाठी अँटीसेप्टिक, बँडेज, पेनकिलर, आणि पाणी शुद्ध करणाऱ्या गोळ्या बरोबर ठेवा.
4. प्रशिक्षित गाईडसोबत जा:
अनोळखी ठिकाणी स्वतःहून न निघता अनुभवी ट्रेक गाईडच्या मार्गदर्शनाखाली ट्रेक करा.
5. हवामानाचा अंदाज घ्या:
ट्रेकच्या आधी हवामान खात्याचा अंदाज पाहा. जोरदार पावसात किंवा वादळी हवामानात ट्रेक करणं शक्यतो टाळा.
6. खाद्यपदार्थ व पाण्याची सोय:
हलकी पण उर्जा देणारी खाण्यासाठी बिस्किट्स, ड्रायफ्रूट्स, एनर्जी बार आणि भरपूर पाणी सोबत ठेवा.
महाराष्ट्रातील पावसाळी ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध ठिकाणं:
1. राजमाची ट्रेक (लोणावळा जवळ):
हिरवाईने नटलेलं, धुक्याच्या दुलईत हरवलेलं हे ठिकाण सुरुवातीच्या ट्रेकसाठी सर्वोत्तम. याचबरोबर श्रीवर्धन आणि मनरंजन किल्ल्यांची देखील सफर करता येते.
2. हरिश्चंद्रगड (अहमदनगर):
कोकणकडा, बलकट डोंगररांग आणि सुळक्यांनी नटलेला हरिश्चंद्रगड हा अनुभवी ट्रेकर्ससाठी स्वप्नवत अनुभव असतो.
3. राजगड किल्ला (पुणे):
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानीचा किल्ला आहे हा . इतिहास, पावसाचे सडे आणि गडावरून दिसणारे नजारे, सगळं काही इथे अनुभवता येते.
4. कळसुबाई शिखर (नाशिक):
हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. पावसाळ्यात चढाई थोडी कठीण वाटू शकते, पण शिखरावरून दिसणारी निसर्गसंपदा मन मोहून टाकते.
5. अंधारबन ट्रेक (ताम्हिणी घाट):
घनदाट जंगलातून, धबधब्यांमधून आणि निसर्गाच्या कुशीतून जाणारा अंधारबन ट्रेक हा हटके अनुभव आहे.
6. लोहगड-विश्रगड ट्रेक (लोणावळा):
सुरेख रस्ता, सुलभ चढाई आणि धबधब्यांनी नटलेली वाट अनुभवायला मिळते . नवशिक्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे हा .
7. सरसगड किल्ला (पनवेल जवळ):
नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आणि फारसा गर्दी नसलेला हा ट्रेक निवांत आणि शांत वातावरणासाठी छान आहे.
ट्रेकिंग आणखी खास कसं होईल?
1. समूहात ट्रेक करा:
एकटे जाण्यापेक्षा ५-६ लोकांच्या ग्रुपमध्ये जाणं अधिक सुरक्षित आणि मजेशीर ठरेल.
2. निसर्गाचं भान ठेवा:
प्लास्टिकचा कचरा टाकू नका, गाणी वाजवून शांतता भंग करू नका. निसर्गाला जपण्याची जबाबदारी आपलीच आहे.
3. योग्य वेळ निवडा:
पहाटे किंवा सकाळी लवकर ट्रेक सुरू करा. संध्याकाळपर्यंत परतीचा मार्ग गाठा.
4. शारीरिक तयारी ठेवा:
चालण्याची सवय, थोडं व्यायाम करणं आणि फिटनेस वाढवणं यामुळे ट्रेक सहज पार पडतो.
5. मोमेंट्स कैद करा, पण सुरक्षिततेसह:
फोटो-व्हिडीओ काढणं महत्त्वाचं, पण त्यासाठी आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेचा विचार करा.
पावसात ट्रेक करणं म्हणजे आनंदाचा अनुभव; पण त्यासाठी योग्य नियोजन आणि सुरक्षिततेच्या टिप्स लक्षात घेतल्या, तर हा अनुभव अविस्मरणीय ठरतो. निसर्गाच्या कुशीत वेळ घालवा, पण जबाबदारीने आणि जपून.





