धरणे भरली आता नियोजन गरजेचे

दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या पुरंदर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात झालेल्या दमदार पावसामुळे बंधारे दुथडी भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे गराडे, पिलानवाडी, नाझरे ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तसेच तालुक्‍यातील सर्वात मोठे धरण असलेले वीर धरणही शंभर टक्के भरलेले आहे. त्यामुळे सासवड, जेजुरी आणि नीरा या शहरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. आता जलसंपदा विभागाने पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजचे आहे.

प्रशासकीय यंत्रणा व जलसंपदा विभाग धरणांमधील पाण्याचे योग्य नियोजन करीत नसल्यामुळे कितीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये टॅंकरच्या मागणीचे प्रस्ताव पंचायत समिती व तहसील कार्यालयामध्ये येण्यास सुरुवात होते. तसेच सासवड, जेजुरी आणि नीरा या तालुक्‍यातील मुख्य शहरांनाही पाण्याच्या समस्येला दर उन्हाळ्यात सामोरे जावे लागते. केवळ सासवड आणि जेजुरी नगरपरिषद यांच्या कारभारावरती दर वेळेला टीका करून हा प्रश्‍न सुटणार नाही. मुळात धरणांमधून केले जात असलेल्या पाण्याच्या विसर्गावरती जलसंपदा विभागाचे नियंत्रण असायला हवे.

धरणातील पाण्याच्या साठ्या बाबतीत जलसंपदा विभागाचे अतिशय अयोग्य पद्धतीचे नियोजन आहे. याची प्रचिती गेल्या उन्हाळ्यातच जलसंपदा विभागाच्या गलथानपणा आणि हातघाईमुळे वीर धरणातून नीरा कालव्यामध्ये केलेल्या विसर्गामुळे सासवड शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस झाला असल्यामुळे प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी पुरंदरकर करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.