बारामती : येथील रेड बर्ड एव्हिएशन खाजगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या शिकाऊ विमानाला आज (9 ऑगस्ट) सकाळी पावणे आठच्या सुमारास अपघात झाला. प्रशिक्षणार्थी पायलट विवेक यादव (वय 24, मुंबई) विमान उडवत असताना पुढील टायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. टायर वाकडे होऊन निखळल्याने विमान टॅक्सीवेवरून बाजूच्या गवतात घुसले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु विमानाच्या पंख्याचे आणि चाकाजवळील भागाचे नुकसान झाले आहे. नेमकं काय घडलं? विवेक यादव यांनी नेहमीप्रमाणे प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतले होते. लँडिंगदरम्यान पुढील टायरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र, टायर निखळल्याने विमान धावपट्टी सोडून गवतात गेले. घटनास्थळी रेड बर्डच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने विमान बाजूला घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले. रेड बर्डकडून या प्रकरणी कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. यापूर्वीही झाला होता अपघात रेड बर्ड एव्हिएशनच्या विमानांना यापूर्वीही बारामतीत अपघात झाले आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये चार दिवसांच्या अंतराने दोन अपघात घडले होते. त्यामुळे डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने रेड बर्डच्या सर्व तळांवरील प्रशिक्षण कार्यवाहीवर निर्बंध घातले होते. यामध्ये तांत्रिक बिघाड आणि देखभाल प्रक्रियेतील त्रुटी आढळल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी हे निर्बंध उठल्यानंतर प्रशिक्षण पुन्हा सुरू झाले, परंतु आजच्या घटनेने पुन्हा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, हा अपघात विमानतळाजवळ घडल्याने मोठी दुर्घटना टळली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर विमान एखाद्या निवासी भागात, शाळेत किंवा MIDC मधील कंपनीवर कोसळले असते, तर मोठी हानी होऊ शकली असती.