Piyush Goyal : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगार वाढतील; उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मत

नवी दिल्ली : केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या मतानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे अनेक नव्या संधी उपलब्ध होणार. तसेच यामुळे देशात रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होणार आहे. गोयल यांनी सांगितले की मी, माझ्या कार्यालयाच्या संचालकांना अशी सूचना केली आहे की, कार्यालयातील प्रत्येकाकडे ए आय आणि चॅटजीपीटीचे आधुनिक मॉडेल उपलब्ध असणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाचा वापर संगणक किंवा मोबाईल वरून करण्यास आपण मुभा दिलेली आहे.
आमचे कार्यालय आणि कार्यालयातील प्रत्येक व्यक्ती कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. मात्र हे तंत्रज्ञान वापरताना काळजी घेण्याचीही तितकीच गरज आहे. किमान सुरुवातीच्या काळात तरी फेरपडताळणी करून हे तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे. गोयल यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रावर गेल्या वीस वर्षांपासून मोठ्या प्रमाणात काम होत आहे. मात्र त्याचा प्रत्यक्ष वापर करण्याइतके हे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. आता या तंत्रज्ञानाची वेळ आली आहे आणि आपण याचा वापर करण्याची गरज आहे. भारताने सदैव नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे.
माहिती तंत्रज्ञान सुरू झाल्यानंतर भारतातील तरुणांनी हे तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे आता या क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. याच क्षेत्रातील तरुण कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अग्रेसर राहतील असा आपल्याला विश्वास आहे. या तंत्रज्ञानाबाबत काहीजण नकारात्मक वातावरण निर्मिती करत आहेत. ते करत राहण्याची शक्यता आहे. मात्र असा प्रकार वेळोवेळी नव्या तंत्रज्ञानाबाबत होत आलेला आहे.
हे तंत्रज्ञान स्वीकारणार्यांची संख्या सध्या जास्त आहे. ही समाधानाची बाब असल्याचे मत त्यांनी वक्त केले. नकारात्मक वक्तव्याकडे दुर्लक्ष करून हे तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन गोयल यांनी केले. भारतात जास्त लोकसंख्या असताना हे तंत्रज्ञान वापरावे काय याबाबत चर्चा होत आहे. मात्र गोयल म्हणाले की, या तंत्रज्ञानामुळे नवे रोजगार मिळतील आणि त्याचा सध्याच्या रोजगारावर परिणाम होणार नाही असा मला विश्वास आहे. तंत्रज्ञानाचा नैतिक पद्धतीने वापर करण्याबाबत प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.





