बारामती पोलिसांकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त…

जळोची- बारामती शहर पोलिसांनी शहरात वास्तव्यास असणाऱ्या मध्यप्रदेशातील एका कडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. प्रताप अमरसिंग पवार (वय 21 वर्ष रा. बागमळा ता.15 जि.खंडवा मध्य प्रदेश, सध्या रा.महादेवमळा पाटस रोड रिंगरोड,बारामती) असे आरोपीचे नाव आहे.
पुणे ग्रामीण हा औद्योगिक जिल्हा असल्याने या भागात अनेक गुन्हेगार अग्नि शस्त्राचा वापर करत असल्याची बाब वरिष्ठ पोलिसांना समजली आहे. बाबत पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पोलिसांना तीव्र मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बारामती शहर पोलिसांमार्फत पूर्वी अग्नी शास्त्राचे गुन्हे दाखल होणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी मोहीम सुरु आहे.सदर मोहीम सुरू असताना पोलीस नाईक दशरथ कोळेकर यांना आरोपी प्रताप अमरसिंग पवार हा लेबर कॉन्ट्रॅक्टर स्वतःजवळ एक अग्निशस्त्र बाळगून असल्याची माहिती मिळाली होत.माहिती मिळताच बारामती शहर पोलीस ठाणे कडील तपास पथकाने रात्री त्याच्यावर छापा मारला असता,आरोपी पवार याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅक्झिन व दोन 7.65 जिवंत काडतुसे असे एकूण २५ हजार शंभर रुपयाचे मुद्देमाल मिळून आला.सदरचा आरोपी हा मूळ मध्य प्रदेश येथील असल्याने त्याने तिथूनच ते हत्यार आणल्याचे सांगितले. त्यांने आणखी कुणाला हत्यार विक्री केली आहे का,तो लेबर लोकांना धाक दाखविण्यासाठी याचा वापर करत होतो का, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.
सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, मनोज पवार, अभि कांबळे व संपूर्ण तपास पथकाने केली आहे.





