गेल्या 3 वर्षांत 7 कोटी ग्रामीण कुटुंबांच्या घरात नळाद्वारे पाणी पोहोचवले; पंतप्रधान मोदींचा दावा

पणजी – सरकारने जल जीवन अभियानांतर्गत गेल्या तीन वर्षांत सात कोटी ग्रामीण कुटुंबांना पाइपद्वारे पाणी कनेक्शन दिले आहे, ज्यामुळे देशाला अशा 10 कोटी कनेक्शनचा टप्पा गाठण्यात मदत झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
गोवा सरकारने राज्यातील 100 टक्के ग्रामीण घरांमध्ये पाइपद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आखली असून त्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान व्हिडिओ लिंकद्वारे संबोधित करत होते. पणजी येथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांमध्ये फक्त तीन कोटी ग्रामीण कुटुंबांना पाइपने पाणी पोहोचले होते. पण गेल्या तीन वर्षांत, या मिशनच्या घोषणेपासून, आमच्या सरकारने सात कोटी अतिरिक्त ग्रामीण कुटुंबांना नळाच्या पाण्याने जोडले आहे असे मोदी म्हणाले.
ते म्हणाले की, जेव्हा त्यांनी जल जीवन मिशनची घोषणा केली तेव्हा 16 कोटी ग्रामीण कुटुंबे पाण्याच्या इतर स्त्रोतांवर अवलंबून होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येला पाण्यासाठी असे तिष्ठत ठेवणे योग्य नव्हते. म्हणून आम्ही हे मिशन हाती घेतले आहे. लोकसहभाग, भागधारकांची भागीदारी, राजकीय इच्छाशक्ती आणि संसाधनांचा इष्टतम वापर यामुळे जल जीवन मिशनचे यश मिळाल्याचे मोदी म्हणाले.





