Pimpri : खरसुंडी पाणीपुरवठा योजनेचे काम अनेक महिन्यांपासून बंद

खालापूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. परंतु काही गावातील योजनांची कामे ही महिनोन्महिने बंद अवस्थेत असून यामुळे येथील गावकऱ्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील खरसुंडी गावात जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर असून गेली कित्येक महिन्यांपासून योजनेचे काम बंद अवस्थेत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना एप्रिल, मे महिन्यात पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागणार आहे.
खरसुंडी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यासाठी लावण्यात आलेले बांबू देखील कुजून गेले आहेत. यावरूनही हे काम किती दिवसांपासून थांबले आहे, हे समजून येईल. या कामाचा ठेका दिलेला ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असून वरीष्ठ अधिकाऱ्यांचा अंकूश नसल्याने कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
सदर पाणीपुरवठा योजनेसाठी ६८ लाख ९७ हजार ४४१ रुपये इतका निधी मंजूर असून हे काम करणाऱ्या ठेकेदाराने थोडेफार काम करून जवळपास २४ लाख १७ हजार ६२० रुपयांचे बिल काढून घेतल्याची माहिती मिळत आहे.
गावात पाणीपुरवठा योजनेसाठी पाइपलाइन फिरविण्यात आली, परंतु पाइपलाइनसाठी योग्य प्रकारे खोदकाम न केल्याने अनेक ठिकाणी पाइप उघडे पडले आहेत. टाकीचे काम अर्धवट अवस्थेत असून टाकीसाठी लावलेले बांबू कुजले आहेत. त्यामुळे बांधकाम कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या ठेकेदारावर कारवाई करून नव्या ठेकेदाराकडून हे काम लवकर पूर्ण करून घ्यावे आणि शासनाने गावकऱ्यांना दिलासा द्यावा.
– एक ग्रामस्थ, खरसुंडी, कुंभिवली ग्रामपंचायत
९२ पैकी फक्त २५ योजना पूर्ण
खालापूर तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत ९२ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. त्यातील २५ योजना पूर्ण झाल्याची माहिती शासकीय स्तरावर मिळाली असून काही योजनांचे काम प्रगतीपथावर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु काम सुरू असलेल्या यादीतील योजनांपैकी अनेक ठिकाणच्या योजनांची कामे जवळपास बंद अवस्थेत आहे. यामुळे संबंधित गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा लवकर उतरेल असे चित्र सध्या दिसत नाही.





