पिंपरी: टपरीधारकांवरील अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने लढा देऊ : कांबळे

पिंपरी – फेरीवाल्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढायला सज्ज असले पाहिजे. अनेक वेळा महापालिकेचे अधिकारी चुकीची कारवाई करतात. या विरोधात आवाज उठविला पाहिजे. तरच आपल्याला न्याय मिळेल. अन्यायाविरूद्ध कायदेशीर मार्गाने लढा देऊ, असे प्रतिपादन टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.
टपरी, पथारी, हातगाडी पंचायतच्या वतीने कांबळे यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाला जनजागृती अभियानांतर्गत शगुन चौक येथे बैठक पार पडली. त्या वेळी कांबळे बोलत होते. पंचायतचे कार्याध्यक्ष बळीराम काकडे, उपाध्यक्ष प्रशांत यशवंते, शहराध्यक्ष रमेश शिंदे, सल्लागार गणेश आहेर आदी उपस्थित होते. बाबा कांबळे म्हणाले, करोनाच्या साथीने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला. या काळात पिंपरी चिंचवड महापालिकेने तीन हजार रुपये कष्टकऱ्यांना देऊ, असे जाहीर केले होते.
मात्र, ते कागदावरच राहिले. त्यामुळे कष्टकऱ्यांची फसवणूक झाली. सध्या चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. अशा कारवाईतून फेरीवाल्यांना उध्वस्त करू नका. यावेळी महापालिकेचे अधिकारी चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असल्याबाबत अनेक फेरीवाल्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत कारवाईबाबत निषेध केला. शगुन चौक शाखा अध्यक्ष राजेश मायरामनी, नारायण खुळशनी, विकी वाघमारे, अमर जयस्वाल, जुनेद आदींनी बैठकीचे संयोजन केले.





