E-Challan Protest : इ-चलनचा ताप आणि परवाना रद्दची टांगती तलवार! रिक्षा-टॅक्सी संघटनांचा ‘संयुक्त लढ्याचा’ इशारा
E-Challan Protest : इ-चलन प्रणालीतील तांत्रिक त्रुटी आणि अन्यायकारक दंड वसुलीविरोधात पुणे व पिंपरी-चिंचवडमधील संघटना एकवटल्या.

E-Challan Protest – वाहतूक पोलिसांच्या इ-चलन प्रणालीतील त्रुटी आणि परवाना रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षा-टॅक्सी चालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या मागण्यांवर लवकरच संयुक्त लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र या पार्श्वभूमीवरही पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात रिक्षा-टॅक्सी सेवा गुरुवारी (दि. ५) सुरळीत होत्या, असा दावा ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे.
काही संघटनांनी चालकांना विश्वासात न घेता आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यामुळे महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. परिणामी शहरातील रिक्षा-टॅक्सी सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहिली. इ-चलन प्रणालीतील त्रुटी आणि ३० दिवसांत परवाना रद्द करण्याच्या नोटीसला संघटनांचा तीव्र विरोध कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आता ‘जॉइंट ॲक्शन कमिटी’च्या माध्यमातून पुढील लढा उभारण्याचे ठरले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून या प्रश्नात सरकार सकारात्मक हस्तक्षेप करेल, असा विश्वास डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला.





