कामशेत : येथील अनेक भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नुकताच फेब्रुवारी महिना चालू झाला असून उन्हाचा तडाखा वाढत आहे. यात मागील चार दिवसांपासून येथील इंद्रायणी कॉलनीतील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. चार दिवसांपासून सार्वजनिक नळाला पाणीच आले नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. कामशेत परिसरातील सहारा कॉलनी, गरुड कॉलनी, देवराम कॉलनी, आदर्श कॉलनी आदी भागात नियमित पाणी येत नाही. कामशेत मधील उर्वरित भागात दररोज पाणी सोडले जाते. परंतू या भागात चार दिवसांनी पाणी येते. जे पाणी येते ते गढूळ पाणी येत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक सांगत आहे. गेली अनेक महिने शहरात अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांना काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांना अनेक वेळा शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. परंतु, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांनी लवकरात लवकर वॉटर फिल्टरचे काम पूर्ण करण्याची नागरिक मागणी करीत आहे. हंडा मोर्चा काढण्याचा इशारा… स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी कॉलनीत ग्रामपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा गेली चार दिवसांपासून खंडित झाला आहे.ही समस्या वारंवार निर्माण होत आहे. यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहे. ग्रामपंचायतीकडून यादरम्यान पाण्याची कोणतीही सोय केली गेली नाही. त्यामुळे नागरिकांना खिशातील पैसे घालवून पाण्याचे टँकर मागवावे लागले. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पाणी देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असे महिलांच्या वतीने सांगण्यात आले. इंद्रायणी कॉलनी वगळला कामशेत गावातील इतर सर्व ठिकाणी दररोज नळाला पाणी येते. आमच्या कॉलनीमध्ये ४-५ दिवसांनंतर पाणी सोडले जाते. तेही पुरेशा दाबाने येत नाही व गढूळ स्वरुपाचे असते. पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही अडणींसाठी फोन केला, तरीही ते फोन उचलत नाही. नियमाने घरपट्टी, पाणीपट्टी भरूनही आमचे पाण्यासाठी हाल होतात. – किरण डुबरे, ग्रामस्थ