पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमने सामने येणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षप्रवेश आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे दोन्ही नेते मंगळवारी (दि.१७) शहरात येणार आहे. उद्योगनगरी असलेल्या या पिंपरी चिंचवड महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी काका – पुतण्यामध्ये लढाई रंगणार असल्याचे चित्र आहे. सन २०१७ पर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. अजित पवार यांचा हा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी शहरात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली. त्याचा परिणाम राज्यात सत्ता असलेल्या भाजपाने पिंपरी महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली अन राष्ट्रवादीच्या हातून बालेकिल्ला निसटला. आता राज्यात राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत तर एक विरोधात आहे. मात्र, पिंपरी महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. शरद पवार गटाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे. मंगळवारी (दि. १७) ताथवडे येथे एका हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. आप आणि मनसेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार आहे. त्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहे. तसेच ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे देखील उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे याच दिवशी पुतणे अजित पवार यांनी काकांना धक्का देण्याची तयारी केली आहे. मंगळवारी (दि. १७) भोसरीमध्ये कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले आणि विधानसभेला महायुतीच्या विरोधात भोसरी मतदारसंघातून उभे ठाकलेले अजित गव्हाणे पुन्हा माघारी फिरणार आहेत. त्यांच्यासोबतच काही माजी नगरसेवक यावेळी अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. एकाच दिवशी होणार्या या कार्यक्रमामुळे दोन्ही राष्ट्रवादीमधील संघर्ष वाढणार असून काका पुतणे आमने-सामने येणार आहे. संघटन बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी मैदानात महापालिकेच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, संघटन बळकट करणे आणि स्थानिक पातळीवरील तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही पक्षाचे मेळावे होणार आहे. पक्षातील गटबाजी, पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर पक्षाची एकी आणि ताकद दाखवणे हा या बैठकीमागील उद्देश आहे. या बैठकीत वॉर्डनिहाय संघटन, संभाव्य उमेदवार, प्रचार यंत्रणा, आणि सोशल मीडिया आघाडीवर कार्यकर्त्यांना दिशा दिली जणार आहे. मंगळवारी शरद पवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी मनसे आणि आप मधील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी तरुणांना मार्गदर्शन करून त्यांना संधी देण्याबाबत वरिष्ठ नेत्यांचा विचार आहे. त्यानुसार निवडणुकीची तयारी सुरू आहे. – तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार