Pimpri : रील्ससाठी महामार्गावर कोंडी; तिघांना अटक, वाहनेही घेतली ताब्यात
Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलिसांची कठोर कारवाई

पिंपरी – सोशल मीडियावर प्रसिद्धी, लाइक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या हव्यासापोटी सार्वजनिक रस्त्यांवर वाहने अडवून रील्स बनवणाऱ्या बेजबाबदार तरुणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कठोर कारवाई केली.
उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संत तुकाराम चौक ते मिंडेवाडी रस्त्यावर चार महागड्या गाड्या समांतर चालवून, मध्येच थांबवून आणि ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शूटिंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चार तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास उत्तर महाळुंगे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यावर काही तरुणांनी त्यांच्या ताब्यातील चारआलिशान वाहने रस्त्याच्या मधोमध उभी केली. मागून येणाऱ्या इतर वाहनधारकांचा रस्ता अडवून, अचानक गाड्यांचा वेग कमी-जास्त करत आणि एकमेकांना समांतर गाड्या चालवून धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी केली. या संपूर्ण प्रकाराचे कॅमेरा व ड्रोनद्वारे चित्रीकरण करून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.
हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारांच्या मदतीने आरोपी आणि वाहनांची ओळख पटवली. राम हिरामण राऊत (रा. भांबोली, ता. खेड), साहिल बारकु जांभळे (रा. वासुली, ता. खेड), आदित्य कैलास निखाडे (रा. भांबोली, ता. खेड) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्यासह त्यांचा साथीदार प्रणव मालक पाचपुते (रा. वासुली, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फॉर्च्युनर (एमएच १४/एनएन ०००५), स्कॉर्पिओ (एमएच १४/ ईसी १६५८), स्विफ्ट (एमएच १४/ एचडब्ल्यू ४७०८), फ्राँक्स (एमएच १४/एलएल २५२०) ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.





