पिंपरी: टोलचा झोल अन् पुढाऱ्यांचा “अल्टिमेटम’

सोमाटणे टोलनाका 10 मेपर्यंत बंद न झाल्यास तीव्र आंदोलन
पिंपरी – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर 2005 मध्ये आयआरबीकडून सुरू झालेला सोमाटणे टोल नाक्याची केंद्र आणि राज्य सरकारची वसुली पूर्ण झाली आहे. त्यानंतरही हा टोलनाका सुरू असून दरवर्षी वाहन चालकांकडून कोट्यवधी रुपयांची आर्थिक लूटच या टोलनाक्यावर दिवसाढवळ्या सुरू असल्याचा आरोप सर्वपक्षीय नेते करत आहेत. तसेच 60 किलो मीटर अंतरावर दोन टोल ठेवता येणार नाही, असे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले असताना हा टोल बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप करत 16 एप्रिल रोजी सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी “टोलच्या झोलवर’ आंदोलन केले.
तसेच हा टोलनाका 10 मेपर्यंत बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा अल्टीमेटम सर्व पक्षीय नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे या टोलनाक्याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. स्थानिक नागरिकांच्या आंदोलनामुळे कोल्हापूर येथील टोल नाका बंद झाला. त्याच धर्तीवर सोमाटणे टोल नाका हटविण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी टोलनाका हटाव कृती समिती स्थापन केली आहे. 2005 साली स्थापन झालेला हा टोलनाका 17 वर्षांनंतरही सुरू आहे.
केंद्र आणि राज्य सरकारची असलेली वसूली या टोल नाक्याच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा टोल कायमस्वरूपी बंद होईल, अशी मावळवाशियांची अपेक्षा होती. मात्र, शासनाने हा टोल बंद न करता टोलसाठी 11 वर्ष मुदतवाढ देऊन नागरिकांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. या टोलच्या माध्यमातून लूट केली जात असल्याची मावळातील जनतेची भावना झाली आहे.
राज्य सरकारने जनतेची लूट थांबवावी. जनता टोल नाका बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरली असून सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशा संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत. टोलनाक्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसोबत आयआरबी कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा केल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत.
मावळवासीयांनी टोल भरु नये. येत्या 10 मे पर्यंत सोमाटणे टोल नाका बंद झाला नाहीतर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे सर्वपक्षीय टोल हटाव कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. कृती समितीच्या वतीने प्रशासनाला 10 मे पर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार आणि आयआरबी काय निर्णय घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आंदोलनातून राजकीय पोळी साधण्याचा काहींचा डाव
सोमाटणे फाटा येथील टोल नाका हटविण्यासाठी सर्व पक्षीय नेतेमंडळी जरी आंदोलन करत असले तरी या आंदोलनातून काही जण आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा डाव आखत आहेत. या आंदोलनामधील काही मंडळींचा तळेगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीवर डोळा असल्याची चर्चा मावळातील राजकीय वतुर्ळात रंगली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीत सोमाटणे टोल नाक्याचा विषय कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.





