तळेगाव दाभाडे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आणि माझी वसुंधरा अभियान ६.० च्या प्रभावी अंमलबजावणी करिता मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे नगरपरिषद, इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि सीआयइ ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद हद्दीतील स्टेशन तलाव, हर्नेश्वर टेकडी येथे वृक्षलागवड व पर्यावरण जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी, उपमुख्याधिकारी ममता राठोड, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष प्रवीण साठे, डॉ. भंडारी, मा. उपनगराध्यक्ष गिरीश खेर, सीआयइ ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेडचे संदीप पानसरे, कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी प्रदीप बोरसे, संदीप गावडे, इएसआयच्या मावळ तालुका अधिकारी अनुराधा टाकळीकर आणिी नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आज प्लॅस्टिक प्रदूषण हे जगासमोर एक मोठे आव्हान आहे. त्यावर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. वृक्षारोपण ही केवळ पर्यावरणाची काळजी घेण्याची बाब नाही, तर आपल्या भावी पिढ्यांसाठी एक सुरक्षित, सुंदर भविष्य निर्माण करण्याची जबाबदारी आहे. संपूर्ण नगरपरिषद कार्यक्षेत्रात २५ हजारांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली नागरिकांनाही मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.