पिंपरी : संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

पिंपरी : संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी बुधवारी (दि. ५) सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक तपासानुसार आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देहूगावात शोककळा पसरली आहे.
शिरीष महाराज यांनी अलीकडेच नवीन घर बांधले होते. त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावर आई-वडील राहत होते, तर ते स्वतः वरच्या मजल्यावर राहत होते. मंगळवारी रात्री ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. मात्र, आज सकाळी ८:३० वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत. घरच्यांनी दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जबरदस्तीने दार तोडून पाहिले असता, त्यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे, ज्यामध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी या पत्राचा तपशील गोळा केला असून, प्राथमिक तपास सुरू आहे. त्यांच्या मोबाइलचा डेटा संपूर्णपणे फॉरमॅट करण्यात आला असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिक तपासात ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे करत आहेत.
लग्नपूर्वीच घेतले टोकाचे पाऊल
शिरीष महाराज मोरे यांचा विवाह होणार होता. घरच्यांच्या इच्छेखातर त्यांनी लग्नाला होकार दिला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांचा टिळा पार पडला होता. मात्र, त्यांनी अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हिंदुत्व आणि धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग
शिरीष महाराज मोरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते आणि ते प्रसिद्ध हिंदू धर्मप्रचारक संभाजी भिडे यांच्या विचारांचे अनुयायी होते. ते वारकरी संप्रदायात सक्रिय होते आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार करत होते. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते.
अंत्यसंस्कार दुपारी चार वाजता
शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे देहू आणि वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे.





