पिंपरी– आंद्रा व भामा आसखेड पाणीपुरवठा योजना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून राबविण्यात आली. या योजनेतून हाती घेतलेले काम अर्धवट स्थितीत असून दिलेल्या मुदतीत पूर्ण झालेले नाही. असे असतानाही या प्रकल्पासाठी निुयुक्त केलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला वारंवार मुदतवाढीचे बक्षीस दिले जात आहे. सलग चौथी मुदतवाढ देण्यात आली असून कंपनीला वाढीव खर्चासह ९ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च अदा केला जाणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही अद्याप प्रकल्प पूर्ण होत नसल्याने महापालिकेला भुर्दंड बसत आहे. भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी आणि आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी आरक्षित आहे. ते पाणी आणण्यासाठी विविध कामे महापालिकेकडून सुरू आहेत. यामध्ये भामा आसखेड पाणी योजनेसाठी धरणाजवळील वाकी तर्फे वाडा येथे जॅकवेल, अॅप्रोच ब्रीज, इंटेड चॅनेल व पंपिंग स्टेशन उभारणे, जलवाहिनी टाकणे आदी कामे विविध पॅकेजमध्ये सुरू आहेत. यामध्ये पॅकेज ३ (अ) अंतर्गत भामा आसखेड धरण येथे अशुद्ध जलउपसा केंद्र बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम मे. गौंडवाणा इंजिनीअर्स लि. आणि टी अँड टी इंन्फ्रा लि. या ठेकेदारांमार्फत सुरू आहे. या कामालाचा कालावधी ३० महिन्यांचा असून तो ऑक्टोबर २०२५ मध्ये संपुष्टात आला आहे. मात्र, हे काम फक्त ७५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित २५ टक्के काम प्रलंबित आहे. नंतर भामा आसखेड़ धरण येथील अशुद्ध जल उपसा केंद्रापासून नवलाख उंब्रे येथील बीपीटीपर्यंत १७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम मे. ऑफशोर इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीकडे असून या कामाची मुदत डिसेंबर २०२५ पर्यंत आहे. हे काम देखील फक्त ५६ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच, पॅकेज ४ अंतर्गत नवलाख उंब्रे येथील बीपीटीपासून देहूपर्यंत १४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम केले जात आहे. हे काम देखील मे. ऑफशोर इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीकडून सुरू आहे. या कामाची मुदत देखील डिसेंबर २०२५ पर्यंत असून ते देखील फक्त ५६ टक्के पूर्ण झाले आहे. काम अपूर्ण असल्यामुळे सल्लागाराला मुदतवाढ देण्याची वेळ महापालिकेवर आली असून अतिरिक्त खर्च अदा करावा लागत आहे. विलंबाला भूसंपादनाचे कारण पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत असून पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक भागांत पाण्याची समस्या आहे. ती सोडविण्यासाठी आंद्रा व भामा आसखेड पाणी योजना लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यापैकी तुर्तास आंद्रा धरणाचे पाणी इंद्रायणी नदीतून उचलले जात आहे. मात्र, भामा आसखेड धरणाचे १६७ एमएलडी पाणी मिळविण्यासाठी भूमिगत जलवाहिनीचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण झालेले नाही. उलट मुदत संपत असताना हे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यासाठी भुसंपादन आणि इतर कारणे दिली जातात. त्याबरोबर या कामास विलंब होण्यास सल्लागार व ठेकेदार देखील तितकेच जबाबदार आहेत. मार्च २०२१ पासून सल्लागाराला मुदतवाढ आंद्रा व भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेस प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे. डीआरए कन्सल्टंट लि. या संस्थेची नियुक्ती ३ मार्च २०१८ रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून या सल्लागाराची मूळ मुदत ३६ महिने म्हणजेच २ मार्च २०२१ पर्यंत होती. त्यानंतर या सल्लागाराला प्रथम मुदतवाढ २४ महिन्यांची २ मार्च २०२३ पर्यंत, द्वितीय मुदतवाढ १८ महिन्यांची २ सप्टेंबर २०२४ पर्यंत आणि तृतीय मुदतवाढ १८ महिन्यांची २ मार्च २०२६ पर्यंत दिलेली आहे. ती आणखी वाढवून २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. मूळ निविदा ७ कोटी २८ लाख ३७ हजार ३० या रकमेची होती. मात्र, सल्लागारी कंपनीला एकूण ९ कोटी ३१ लाख ५७ हजार ९३१ खर्च अदा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.