पिंपरी – सणासुदीच्या काळात खासगी बस संचालकांकडून प्रवाशांची अक्षरशः लुट सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आरटीओ अधिकाऱ्यांनी खासगी बसमालकांसोबत घेतलेल्या बैठकीत एसटी भाड्याच्या दीडपटच भाडे आकारण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांना खासगी बस संचालकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. जशी-जशी दिवाळी जवळ येत आहे, बस संचालक रोज बस भाड्यामध्ये वाढ करत आहेत. औद्योगिकनगरी म्हणून प्रख्यात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या काना-कोपऱ्यातून नागरिक उदरनिर्वाहासाठी आले आहेत. दिवाळीच्या सणाला घरी जाण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही खासगी बस संचालकांनी या संधीचा गैरफायदा घेत बस भाड्यामध्ये वारेमाप वाढ केली आहे. तिकिटांचे दर एक हजार ते चार हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहचले आहेत. आरटीओकडून दरांबाबत स्पष्ट नियम असतानाही नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. आरटीओकडून अद्याप कोणतीही मोठी कारवाई झाली नाही, आरटीओ प्रशासनाला नागरिकांकडून तक्रार येण्याची प्रतीक्षा आहे. वाहतूक प्रशासनाने खाजगी प्रवासी वाहनांसाठी दरवाढीसंबंधी स्पष्ट निर्देश दिले आहेत. मंजूर वेळापत्रक आणि परवानगीपत्रानुसारच प्रवास करणे, प्रवाशांकडून निश्चित दरापेक्षा जादा भाडे न आकारणे, प्रवासाचे तिकीट देणे आणि प्रवासाची माहिती स्थानिक परिवहन कार्यालयात नोंदविणे या नियमांचे पालन प्रत्येक बस चालक आणि मालकाने करणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात या नियमांचे उल्लंघन खुलेआम सुरू असून, प्रवाशांना दर वाढीचा फटका बसत आहे. सणासुदीच्या गर्दीत बससेवा कमी, प्रवाशांची वाढती संख्या आणि प्रवासाची गरज यांचा फायदा घेत खाजगी बस चालक मनमानी दर लावत आहेत. वाहतूक प्रशासनाकडून कारवाईचा इशारा दिला असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती बदललेली नाही. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे हाल सुरूच राहिले आहेत, आणि खाजगी बस मालक मात्र या लुटीतून चांगलीच दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. वाढता वाढे दर निगडी ते जळगाव या मार्गावर १५ ऑक्टोबर रोजी एका आसनासाठी १००० ते १६०० रुपये दर आकारले गेले. परंतू १८ ऑक्टोबरला हेच हर १९०० ते २२०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. निगडी ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावरही परिस्थिती काही वेगळी नाही. १५ ऑक्टोबरला प्रवासाचे दर १२०० ते १४०० रुपये असताना, तर १८ ऑक्टोबरला १५०० ते १७०० रुपये इतके दर आकारले जात आहेत. सर्वाधिक लूट निगडी ते नागपूर या मार्गावर दिसून येत आहे. १५ ऑक्टोबरला ३००० ते ३५०० रुपये आणि १८ ऑक्टोबरला ३५०० ते ४००० रुपयांपर्यंत ही दरवाढ दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या सर्व मार्गांवरील नियमित दर हे ७०० ते १६०० दरम्यान असतात. त्यामुळे या दरवाढीचा विचार केला असता मोठा फरक दिसून येतो. इतर पर्यायांचा वापर शहरातील अनेक तरुण मंडळींनी थेट आपल्या दुचाकीला किक मारण्याची तयारी केली आहे. तर ज्यांच्याकडे चारचाकी आहे ते आपल्यासोबत इतर मित्रांना घेऊन जाणार आहेत. काहींनी थेट सोशल मीडियावरील ग्रुपमध्ये पोस्ट टाकल्या आहेत. ज्यामध्ये कुणी जाणार असेल तर आपल्यालाही यायचे आहे. असे मेसेज आहेत तर काहींनी आम्ही अमुक तारखेला जाणार असून इतकी सहयोग राशी अपेक्षित आहे. अशा पोस्ट टाकल्या आहेत. त्याचप्रकारे काही अॅप्सचाही प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. एसटी आरक्षणासाठी मोठी गर्दी खासगी बसचे भाडे परवडण्यासारखे नसल्याने बहुतेकांनी थेट वल्लभनगर येथील एसटी आगार गाठले असून आरक्षण खिडकीबाहेर सध्या प्रवाशांच्या रांगा दिसत आहेत. एसटीकडून अतिरिक्त बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत तरीदेखील प्रवाशांच्या संख्या पाहता बसची संख्या तोकडी ठरत आहे. तर दिवाळी कशी साजरी करायची? महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आरक्षणच्या रांगेत असलेल्या एका प्रवाशाने सांगितले की खासगी बसचे भाडे एवढे वाढले आहे की संपूर्ण कुटुंबाच्या जाण्या-येण्याच्या खर्चात पगार आणि बोनस संपून जाईल. मग आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? एसटी हाच सध्या योग्य पर्याय आहे. सीट मिळाले तर जाऊ अन्यथा शहरातच दिवाळी साजरी करु. अशी परिस्िथती अनेक नागरिकांसोबत असल्याने सध्या एसटीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे. तसचे प्रवाशांना मागणी केली आहे की एसटीने जादा बसची संख्या आणि फेऱ्या वाढवाव्यात.