Pimpri : भरधाव कंटेनरच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू

मावळ : वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला भरभाव कंटेनरने चिरडले, यात वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १३ मे) रात्री पाऊणे दहाच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव फाटा येथे घडली. मिथुन वसंत धेंडे (वय ४९, रा. उरुळी कांचन, पुणे. सध्या कार्यरत, वडगाव पोलीस स्टेशन ता. मावळ) असे अपघातात मृत्यू पावलेल्या पोलिसाचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कंटेनर मुंबईहून चाकणच्या दिशेने भरधाव वेगाने निघाला होता. वाटेतही त्याने धोकादायकपणे काही वाहनांना मागे टाकले होते. या कंटेनरला थांबविण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. त्यानुसार, कर्तव्यावर असलेले पोलीस मिथुन धेंडे यांनी तळेगाव फाटा येथे कंटेनरला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु कंटेनर चालक त्यांना धडक देऊन चिरडून पुढे निघून गेला. धेंडे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर कंटेनर चालक तिथे न थांबता चाकणच्या दिशेने वेगाने निघून गेला. हा कंटेनर चालक कार्ला फाटा येथून धोकादायक पद्धतीने आणि भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याचे, असे एका तरुणाने सांगितले. त्याने कंटेनरचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आहे. त्याने ही माहिती पोलीस कंट्रोलला दिल्यानंतर सदर कंटेनर थांबविण्याच्या सूटना देण्यात आल्या होत्या. पण ह्या भरधाव कंटेनरने पोलिसालाही चिरडले व निघून गेला.
घटनास्थळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी भेट दिली. त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच संबंधित कंटेनर चालकास लवकरात लवकर पकडून कठोरातील कठोर शिक्षा ठोठवावी, अशी मागणी सामान्यांकडून होत आहे. अपघाताचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत.
वाढदिवसाच्या आदल्या रात्री मृत्यू
मिथून धेंडे यांचा बुधवारी (दि. १४ मे) रोजी वाढदिवस होता, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. अत्यंत मितभाषी आणि हसतमूख स्वतभावाचे मिथून धेंडे हे सर्वांचेच मित्र होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सहकाऱ्यांनी सेलिब्रेशनचा प्लॅनही केला होता. परंतु आदल्या रात्री त्यांचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.





