Pimpri : पिंपरीत 400 एकरमध्ये होणार निरंकारी संत समागम

पिंपरी : पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मच्या सुमारे 400 एकरच्या विस्तीर्ण मैदानात शुक्रवारपासून (दि.24) तीन दिवसीय निरंकारी संत समागम सुरू होत असून, त्याची सांगता 26 जानेवारीला होणार आहे.
मुख्य सत्संग कार्यक्रम दररोज दुपारी 2 वाजता सुरू होईल ज्यामध्ये अनेक वक्ते, गीतकार, कवी सद्गुरु आणि ईश्वराप्रती आपल्या मनातील भावना व्यक्त करतील. शेवटी रात्री 8 वाजल्यापासून माता सुदीक्षा जी महाराज यांचे मार्गदर्शन होईल. समागमात सहभागी होणार्या सर्व भक्तगणांसाठी व्यापक स्तरावर निवासी तंबू, लंगर, कॅन्टीन, दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग आणि रेल्वे स्थानक आणि बसस्थानकातून ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्था इत्यादीची यथोचित व्यवस्था करण्यात आली आहे.
समागम स्थळावर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. प्रकाशन विभागाकडून समागम स्थळावर वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावले जात आहेत. संत निरंकारी मिशनचे सचित्र दर्शन घडविण्यासाठी आकर्षक निरंकारी प्रदर्शनीचेही आयोजन केले जात आहे.
यासह एकूण आठ कार्यशाळा असलेली भव्य बाल प्रदर्शनी देखील असणार आहे. तर प्रत्येक कार्यशाळा मुलांना आकर्षक व शैक्षणिक अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.





