Pimpri News | करप्याचा कहर! पवनानगरात भातशेतीवर रोगराईचा घाला ; शेतकरी चिंतेत

प्रभात वृत्तसेवा
पवनानगर – तालुक्यातील भातशेतीवर करपा रोगाने घाला घातला असून शेतकऱ्यांच्या पदरी मोठी चिंता पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची अनियमिता, कधी सतत मुसळधार पाऊस तर मध्येच कडक ऊन, यामुळे भातपिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामध्ये विशेषतः करपा रोगाचा फैलाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
भात लागवडीनंतर सुरुवातीला मुसळधार पावसाने शेती गारठली होती. त्यानंतर पावसाने उसंत घेतली आणि कडक उन्हाची तीव्रता वाढली. या बदलत्या हवामानामुळे भात पिकावर रोगराई कोसळली आहे. तालुक्यातील अनेक भागांत भात पिकांच्या पानांवर लालसर व तांबड्या डागांचा प्रादुर्भाव झाला असून करपा रोगामुळे पाने आणि रोपे जळून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा रोग नियंत्रणात आणला नाही तर हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊ शकते आणि उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.शेतकरी संघटनांकडूनही रोगराईमुळे चिंता व्यक्त करण्यात आली असून करपा, तांबेरा, तुडतुडे, बुरशीजन्य रोग अशा समस्या भातशेतीला पोखरत असल्यामुळे कृषी विभागाने त्वरित मार्गदर्शन व कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना योग्य उपाययोजना सांगणे आवश्यक असल्याचे मत मांडण्यात येत आहे.
पारंपरिक पद्धतीने रोगनियंत्रण करण्याऐवजी अत्याधुनिक व प्रभावी औषधांची माहिती देणे ही काळाची गरज असल्याचे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे मावळातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण असून, योग्य वेळी उपाययोजना न झाल्यास भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाचे मार्गदर्शन..
पवन मावळ परिसरात करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. रोगाच्या नियंत्रणाकरिता SAAF हे बुरशीनाशक १५ लिटर पंप करिता ३० ग्रॅम (प्रति लिटर २ ग्रॅम) या प्रमाणात किंवा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर CONIKA हे बुरशीनाशक प्रति पंप ३० ग्रॅम या प्रमाणात फवारावे. सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फवारणी करावी.
पावसामुळे औषध वाहून जाऊ नये म्हणून फवारणीसोबत सिलिकॉनयुक्त स्टिकर वापरणे फायदेशीर ठरणार आहे. रोग नियंत्रणासाठी उपाययोजनांची माहिती व मार्गदर्शन प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार असून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहिम राबवली जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी अर्चना वडेकर यांनी दिली.





