Pimpri News : पिंपळे गुरवमधील कल्पतरू चौकात बांधणार सबवे ; अर्थसंकल्पात ३५ कोटींच्या तरतुदीस मान्यता

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – वाकड ते नाशिक फाटा या बीआरटी मार्गावर पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटी चौकात सबवे बांधण्यात येणार आहे. त्या कामासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ३० कोटी रक्कमेत वाढ करून ३५ कोटी करण्यात आली आहे. या वाढीव तरतुदीस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे.नाशिक फाटा चौकातील जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या पुलावरून वाकडच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात. पिंपळे गुरव-भोसरी पुलावरून वाहतूक आल्यानंतर ती कल्पतरू चौकातील सिग्नलला अडकून पडते.
तसेच, बेशिस्त वाहनचालक सिग्नल न पाळता वाहन पळवतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे हा चौक बंद करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाकडून करण्यात आला. मात्र, राजकीय दबावामुळे तसेच, वाहनचालकांच्या विरोधामुळे तो निर्णय मागे घेण्यात आला. आता त्या चौकात सबवे बांधण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ३० कोटी रक्कमेची तरतूद केली आहे. त्यात वाढ करून ती ३५ कोटी करण्यात आली आहे. अर्बन ट्रॉन्सपोर्ट फंड व विशेष योजनेच्या लेखाशिर्षात त्या रक्कमेची तरतूद करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
तसेच, पिंपळे सौदागर येथील पीके चौक सिग्नल फ्री करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३० कोटीऐवजी ४५ कोटी रक्कमेचा खर्च केला जाणार आहे. थेरगाव येथील डांगे चौकातील अस्तित्वात ग्रेडसेपरेटरची थेरगाव फाट्याकडील लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी २८ कोटीऐवजी ५० कोटी रूपयांचा खर्च केला जाणार आहे.पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म येथे उड्डाण पुल बांधत आहे.
पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलावरून पिंपरी गाव, पिंपरी कॅम्प, पिंपळे सौदागरकडे ये-जा करणे सुलभ होणार आहे. परिणामी, पुलावरून वाहतूक वाढणार आहे. पुलावरून आलेल्या वाहनांना दापोडी ते निगडी मार्गावर जाता यावे म्हणून त्या मार्गावर हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यामुळे दापोडी ते निगडी मार्गावरून डेअरी फार्म पुलावर जाणे सुलभ होणार आहे.
आयटीआय इमारतीसाठी १२० कोटी..
फुगेवाडीतील हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम दफनभूमीकडे जाण्यासाठी रेल्वे लाईन व नियोजित ३० मीटर एचसीएमटीआर मार्गाच्या खालून भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्या कामासाठी रेल्वे विभागाचे शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी २० कोटी रूपये खर्च वाढवून ३० कोटी करण्यात आला आहे. चिंचवड येथील एम्पायर एस्टेट उड्डाण पुलाजवळ आयटूआर अंतर्गत ताब्यात आलेल्या जागेवर आयटीआय बांधण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष योजनेतून १०० कोटी रक्कमेची तरतूद करण्यात आली होती. ती वाढवून १२० कोटी इतकी करण्यात आली आहे. तरतूद वाढीस आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.





