Pimpri News : एसटी महामंडळाची दिवाळी भेट ; १५ ऑक्टोबरपासून ३९६ जादा बस

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पिंपरी-चिंचवड (वल्लभनगर) आगारातून तब्बल ३९६ जादा बस सोडण्यात येणार आहेत. या विशेष बस १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत धावणार असून, त्यामुळे दिवाळी सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शहरातून जादा सुटणाऱ्या या बसगाड्यांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातून शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांना गावी जाण्यासाठी मोठी सोय होणार आहे. सणासुदीच्या काळात गावाकडे जाण्याचा ओघ वाढतो. अशावेळी सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी प्रवासी एसटी बसला पसंती दिली जाते.
शहरातील एच. ए. मैदानात जादा बससाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे. या बस पिंपरी-चिंचवड आगाराच्या सुटतील. एसटी महामंडळाने विविध योजनेअंतर्गत प्रवाशांना तिकीट दरात सवलती जाहीर केल्या आहेत. ४ वर्षांखालील मुलांना मोफत प्रवास, १२ वर्षापर्यंतच्या मुलांना अर्धे तिकीट, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट, ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, सर्व महिला प्रवाशांना अर्धे तिकीट असेल. तसेच एसटी महामंडळाने लालपरी, शिवशाही, शिवनेरी आणि शिवाई या आरामदायी बस प्रवाशांच्या सेवेत तैनात केल्या आहेत.
बुकिंग करण्याची सोय..
या जादा बससाठी आरक्षणाला (बुकिंग) सुरुवात झाली आहे. बस स्थानकांवर, अधिकृत आरक्षण केंद्रांवर तसेच ऑनलाइन www. msrtc.gov.in आणि www.msrtcors.co. in या संकेतस्थळांवर आरक्षण करू शकतात.
“५८९ जादा गाड्यांपैकी पिंपरी-चिंचवड आगारातून ३९६, स्वारगेट आगारातून ११३, गाड्या सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी महामंडळाने केलेल्या सोयीचा लाभ घ्यावा.”
– अरुण सिया, नियंत्रक, वललभनगर आगार


