Pimpri News | ३२ प्रभागांतून निवडणूक लढण्याची शिवसेनेची तयारी-खासदार श्रीरंग बारणे

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची तयारी झाली आहे. इतर पक्षांतील पदाधिकारी देखील शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुक आहे. सर्व ३२ प्रभागांमधून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे, असे प्रतिपादन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे. दैनिक प्रभातच्या पिंपरी-चिंचवड कार्यालयात गणरायाच्या आरतीसाठी आले होते. डिजिटल प्रभातला मुलाखत देताना बारणे यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
बारणे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहर आता मोठे झाले आहे. नागरीकरण झपाट्याने वाढल्याने समस्याही वाढल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी सतत पाठपुरावा सुरु असतो. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प जलद गतीने मार्गी लावण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. २००५ साली आलेल्या पुरानंतर पूररेषा निश्चित करण्यात आल्या. परंतु त्यापूर्वी अधिकृत असलेली बांधकामे देखील पूररेषांमध्ये आली. नदी सुधार प्रकल्प झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल.
देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक या शहरात येत असतात. त्यामुळे नागरिकरण झपाट्याने वाढले तशा वाहतुक कोंडी, नदी प्रदूषण, रस्ते, पाणी याबाबतच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठीचे काम पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने करावे लागणार आहे. केंद्र शासनाच्या अमृत भारत योजनेसह अन्य योजनेतून रस्ते, उड्डाणपुलासह अन्य प्रकल्पासाठी निधी येत आहे.
केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड् शहरात सर्वात जास्त घरकुल देण्याचे काम करण्यात आले आहे, असे बारणे यांनी सांगितले. नदी पात्रातील पूररेषेतील नागरिकांवर अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.रेल्वे बाबतची अनेक कामे पूर्ण झाली आहेत. काही कामे सुरु असून काही कामे राबविण्याबाबतचे नियोजनही केलेले आहे. रेल्वेसाठी २१ ठिकाणी भुयारी मार्ग, ५ ठिकाणी उड्डाणपुलाचे नियोजन केले.
चिंचवड, देहूरोड, आकुर्डी, लोणावळा, पनवेल येथे आधुनिक रेल्वे स्टेशन उभारण्याबाबत सतत पाठपुरावा केला. पनवेलचे रेल्वे स्टेशन हे महत्वाचे मॉडेल ठरणार आहे. पुणे ते लोणावळा या रेल्वे मार्गात तिसरा व चौथा रेल्वे ट्र्कसाठी यासाठी केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा ५० टक्के निधी अपेक्षित आहे. केंद्र सरकार २०१७ पासून अर्थसंकल्पात निधीची तरतूद करत आहे. परंतु राज्य शासनाकडून निधी मंजूर होत नव्हता.
परंतु तत्कालीन मुख्यमंत्र एकनाथ शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी या विषयास गांभिर्याने घेतले असून हा विषय लवकरच मार्गी लागेल. राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होताच तात्काळ कामे सुरु होतील, असे बारणे यांनी ठामपणे सांगितले. प्रवाशांना सर्वौत्तम सुविधा देण्यासाठी सतत प्रयत्न सुरुच असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. भक्ती शक्तीपासून मुकाई चौक, किवळे, वाकड, नाशिक फ़ाटा ते चाकण या नवीन मेट्रोच्या मार्गालाही मंजुरी मिळत असल्याने वाहतुकीचा प्रश्नही सुटणार आहे, असे बारणे यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे..
मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे. मात्र आरक्षण देत असताना शहरातील सधन, पुढारलेल्या समाजाएवजी ग्रामीण भागातील मागासलेल्या मराठा समाजातील नागरिकांनाच आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. आरक्षणासाठी लढा देणे हे योग्यच आहे. आरक्षणाबाबत निर्णय घेत असताना तो न्यायालयाच्या अधिन राहुनच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केले आहे.





