Pimpri News | सर्जा-राजाचा रुबाब कमी होतोय ; गावखेड्याची परंपरा जपण्याची गरज

प्रभात वृत्तसेवा
कान्हे – तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण म्हणजे बैलपोळा.या सणाच्या तयारीसाठी गावागावांतील बाजारपेठा रंगीबेरंगी साहित्याने सजल्या असतात. परंतु या पारंपरिक सणाला ओळख मिळवून देणारी सर्जाराजाची रुबाबदार जोडी आता गावखेड्यातून काही प्रमाणात कमी होत चालल्याचे चित्र दिसत आहे. शेतीसाठी जपले जाणारे बैल आता कमी झाले असून काही मोजके शर्यतप्रेमी बैलगाडा शर्यतीसाठी बैल सांभाळत आहेत.
पूर्वी प्रत्येक शेतकरी घरात बैलजोडी असायची. शेतातील सर्व कामे जसे की, नांगरणी, वखरणी, पेरणी यांसारखी कामे बैलांच्या मदतीने पार पडली जायची. शेतकरी आपल्या बैलांना घरातील सदस्याप्रमाणेच जपत असत. परंतु गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले. ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, अवजारे व इतर आधुनिक साधने सहज उपलब्ध झाल्याने शेतकरी यंत्रणेकडे वळला आहे. त्याचा परिणाम म्हणून गावोगावी बैलांचे प्रमाण झपाट्याने घटले आहे. आज अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बैल राबण्याऐवजी भाड्याने ट्रॅक्टर घेऊन शेती कामे करताना दिसतात.
बैलपोळ्याचा सण अजूनही जिवंत..
यंत्रणेकडे झुकाव वाढला असला तरी बैलपोळ्याचा सण मात्र आजही ग्रामीण भागात उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद अमावस्येला होणारा हा सण शेतकऱ्याच्या बैलांच्या सन्मानाचा दिवस मानला जातो. शेतकरी आपल्या बैलांना तेल चोळून, रंगरंगोटी करून, मातीची माळ, रंगीत कागद, झुल, घंटा, फुलांच्या माळांनी सजवतात. या दिवशी बैलांचे पाय धुऊन, त्यांना गूळ-भाकरी खाऊ घालून सणाचा आनंद घेतात. काही गावांत बैलांची मिरवणूक काढली जाते आणि गावभर सणासुदीचे आणि उत्साहाचे वातावरण असते.
परंपरा जपण्याची गरज..
शेतकऱ्यांच्या मते, बैल हे फक्त शेतीची साधने नसून घरातील एक कर्ता धनी असतात. बैलांचे संगोपन, त्यांना वेळोवेळी औषधोपचार, चारा-पाणी देणे हे काम खूप कष्टाचे आहे. आजच्या बदलत्या कृषी पद्धतींमध्ये ही जबाबदारी पेलणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. तरी देखील बैलपोळा हा सण बैलांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करतो आणि तोच परंपरेचा गाभा आहे. गावोगावी अजूनही ज्यांच्याकडे बैलजोडी आहे ते शेतकरी या परंपरेचा मान राखत सण साजरा करतात.





