प्रभात वृत्तसेवा पिंपरी – इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली प्राधिकरण परिसरातील रॉयल हेरिटेज बिल्डिंगमध्ये १ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.दयाल रजित सिंग (वय १८, रा. जि. बक्सा, आसाम) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत त्याचा चुलत भाऊ गोविंदा शंभु सिंगा (वय २२, रा. सेक्टर १३, चिखली) यांनी शुक्रवारी (दि. २६) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ठेकेदार भरत विठ्ठल चव्हाण (रा. शुभागंण सोसायटी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली प्राधिकरण परिसरातील रॉयल हेरिटेज बिल्डिंगमध्ये १४ व्या मजल्यावर सुरू असलेल्या सेट्रींगच्या कामावेळी ठेकेदार भरत विठ्ठल चव्हाण (रा. शुभागंण सोसायटी, चिखली) याने कामगाराला आवश्यक सुरक्षिततेची साधने न देता काम करण्यास भाग पाडले. या वेळी कामगार दयाल रजित सिंग (रा. जि. बक्सा, आसाम) याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि जागीच ठार झाला. या प्रकरणी दयालचा चुलत भाऊ याने तक्रार दिल्यानंतर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.