Pimpri News | पावसाचा कहर! हजारो नागरिकांचे स्थलांतर ; महापालिका सज्ज

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – शहर परिसरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणामधून करण्यात येणाऱ्या पाणी विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पवना व मुळा नदीला आलेल्या पूरामध्ये शहरातील एक हजारहून अधिक नागरिकांचे मंगळवारी (दि. १९) रात्री निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले. आवश्यक साहित्य, कागदपत्रे आणि मोजक्या कपड्यांसह नागरिकांनी निवारा केंद्रात आश्रय घेतला. त्याठिकाणी भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
तसेच महापालिकेच्या वतीने बुधवारी (दि. २०) रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना स्थलांतरीत केलेल्या स्थळांना भेट देऊन पाहणी केली. महापालिकेने ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पुराने बाधित झालेल्या भाटनगर परिसर, पिंपरी येथील सुमारे ७५ नागरिकांना कै. नवनाथ दगडू साबळे शाळा, बुद्धविहार भाटनगर व चेकान दास मेवाणी सभागृह भाटनगर येथे स्थलांतरित केले होते. लेबर कॅम्प, किवळे, केशवनगर, जाधव घाट, काळेवाडी परिसरातील ६२८ नागरिकांचे स्थलांतर म्हाडा वेलींग किवळे येथील म्हाडा सदनिका व वाल्हेकरवाडी शाळा येथे केले आहे.
पिंपळे निलख पंचशील नगर परिसरातील ३२ नागरिकांना पिंपळे निलख प्राथमिक विद्यालय क्र. ५२, ५३ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. रामनगर बोपखेल भागातील ४५ नागरिकांचे स्थलांतर रामनगर बोपखेल पिंपरी चिंचवड मनपा शाळा येथे करण्यात आले आहे. संजय गांधी नगर हा भाग पुराने बाधित झाला असून येथील १२५ नागरिकांचे कमला नेहरू शाळा येथे स्थलांतर करण्यात आले आहे. तर, पिंपळे गुरव लक्ष्मीनगर भागातील ४५ नागरिकांना भगतसिंग शाळा, गुलाबनगर, पिंपळे गुरव प्राथमिक विद्यालय क्र. ५४ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. याशिवाय बांधकामाच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या काही कामगारांना म्हाडाच्या घरामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
शहरातील नदीकाठावरील पुराने बाधित होऊ शकणाऱ्या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयाकडील तसेच अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा विभाग यांच्याकडील पथके तैनात करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी अग्निशमन विभागाचे बंब, बोट, रुग्णवाहिका, बाधित नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी आवश्यक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी मदत केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यासाठी पीएमपीएमएलच्या बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे ड्रेनेज चोकअप होणे, रस्त्यावर पाणी साचणे या स्वरूपाच्या तक्रारीच्या अनुषंगाने क्षेत्रीय कार्यालयामार्फत पथक पाठवून त्या तक्रारींचे निराकरण करण्यात आलेले आहे.
जलद प्रतिसाद यंत्रणा तैनात..
महापालिकेकडून पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या लगतची वस्ती, सोसायटी व भाग या ठिकाणी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या असून प्रतिसाद यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून सर्च अँड रेस्क्यू टीम्स उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे नजीकच्या ठिकाणी मदत केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था व त्याप्रमाणे आवश्यक आरोग्याची व्यवस्था करून देण्यात आली होती.
२४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत..
शहरामध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नागरिकांना तातडीने संपर्क करता यावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत आहे. या कक्षामधून सी-डॅक, हवामान विभाग यांच्याशी समन्वय ठेवून हवामानाविषयी माहिती वेळोवेळी घेतली जात आहे. वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवण्यात आला आहे. सिंचन विभागाशी समन्वय साधून दर तासाला पाण्याच्या विसर्गाची अद्ययावत माहिती घेण्यात येत आहे. महापालिकेच्या नियंत्रण कक्षात आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस बिनतारी यंत्रणा, अग्निशमन विभाग, स्थापत्य विभाग, मलनिःसारण विभाग अशा विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
“पिंपरी चिंचवड शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी अजिबात घाबरून न जाता सतर्क राहावे. शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशा भागावर महापालिका प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. पुराने बाधित होणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले जात असून तेथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला संपर्क करावा.”
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका





