पिंपरी| प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह

पिंपरी,(प्रतिनिधी) – गेली महिनाभरापेक्षा अधिक काळ सुरू असलेले इंद्रायणी नदीचे प्रदूषण आजही अविरतपणे सुरूच आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी राबविलेल्या शोध मोहिमेनंतरही इंद्रायणीचे फेसाळणे सुरूच असल्याने या विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केला जात आहे. श्री क्षेत्र आळंदीत इंद्रायणीनदी फेसाळण्याच्या प्रश्न विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजला. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी जुजबी उत्तरे देऊन वेळ मारुन नेली. त्यानंतरही इंद्रायणीच्या प्रदूषणातील सातत्य कायम राहिले.
दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे शहराच्या दौर्यावर असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब प्रसारमाध्यमांनी आणून दिली. प्रश्न एवढा गंभीर असेल, तर मी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांशी बोलतो, असे ते म्हणाले होते. दरम्यानच्या काळात या प्रश्नावर महापालिका, पीएमआरडीए व प्रदूषण नियंत्रण मंडळावर चौफेर टीका होऊ लागल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी रात्री मोहीम राबवत, इंद्रायणी फेसाळणार्या उद्योग शोधून, संबंधितांना तंबी दिल्याची चर्चा रंगली होती.
त्यानंतर काही दिवस नदीचे फेसाळणे कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा फेसाळणार्या इंद्रायणीचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रदूषणाला कारणीभूत ठरणार्या उद्योगांचा शोध घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने खरच तंबी दिली का , असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वारकरी, भाविकांच्या जीविताशी खेळ
सध्या आळंदीकरांना काही वर्षांपासून भामा -आसखेड प्रकल्पामधून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे आळंदीकरांची काळ्या पाण्याची शिक्षा संपली आहे. तर माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनाकरिता आळंदीत दररोज हजारो भाविक येत असतात. प्रदूषणाबाबतची माहिती नसल्याने हे भाविक हेच पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. त्यामुळे जिल्हा प्रशासन प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून, वारकर्यांच्या जिवाशी खेळ करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया आहे.




