प्रभात वृत्तसेवा पिंपरी – दसऱ्याच्या दिवशी यंत्रांची आणि वह्या-पुस्तकांची पूजा केली जाते. परंतु दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असल्याने कामगार वर्ग खंडेनवमीच्या दिवशी यंत्रपूजन करतात तर शाळांमध्ये दसऱ्याच्या आदल्या दिवशी पाटीपूजन केले जाते. शहरातील अनेक शाळांमध्ये मोठ्या उत्साहात पाटीपूजन करुन शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. हळूहळू काळ्या पाट्या आता कालबाह्य होत असल्याने पाटीपूजनाच्या निमित्ताने वह्या आणि पुस्तकांची पूजा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या वह्या पुस्तकांवर फुले अपर्ण करुन विद्येच्या देवीची आराधना केली. पाटीपूजन म्हणजे सरस्वती मातेची पूजा करणे, विशेषतः दसऱ्याच्या दिवशी. या पूजेमध्ये विद्यार्थी आपल्या पाटीची (फळ्याची) पूजा करतात आणि विद्या, ज्ञान देणाऱ्या सरस्वती देवीची आराधना करतात. चिमुकल्यांची अशी धारणा असते की यामुळे त्यांना अभ्यासात प्रगती करता येते. सरस्वती देवी ही ज्ञान आणि कलेची देवता मानली जाते, म्हणून तिची पूजा करून अभ्यासात यश मिळवण्यासाठी पाटीपूजन केले जाते. शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली पाटी स्वच्छ करुन त्याचे पूजन केले. काही ठिकाणी पाटीवर ‘श्री’ किंवा ‘सरस्वती’ असे शब्द लिहून पूजेची सुरुवात केली जाते.ऑनलाइनच्या जगात आजही पाटीपूजन तग धरुन आहे. आपली संस्कृती आणि परंपरेची कास सोडायची नाही, असा जणू काही आबालवृद्धांनी केलेला हा निर्धारच आहे. लहान मुले देखील आता जास्त पाटी वापरत नाहीत. वह्यांवर पेन्सिलने लिहतात. तरी देखील पाटीपूजनाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. शहरातील अनेक शाळांमध्ये विशेषत: महापालिकेच्या शाळांमध्ये ही परंपरा जपण्यात आली.