pimpri news : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसचा शक्तीप्रदर्शन मेळावा

मावळ – मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्याद्वारे पक्षाने ताकद दाखवली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पक्ष संघटन बळकट करणे, निवडणूक धोरण ठरवणे आणि जनतेपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवणे या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. उपस्थितांनी पक्षाच्या झेंड्याखाली काम करण्याची शपथ घेतली.
वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना संघटनशक्ती वाढविण्याचे आणि जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्याचे आवाहन केले. मावळच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल, असा ठाम निर्धार या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला.
मावळचे आमदार सुनील शेळके यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती. शेळके यांनी मावळच्या विकासकामांबाबत आणि जनतेशी सतत संवाद ठेवत पक्षाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
तसेच, सोमवारी (दि. २०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन या मेळाव्यात करण्यात आले. या बैठकीला मावळ तालुक्यातील सर्व सेलचे पदाधिकारी, सुकाणू समितीचे सदस्य, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





