Pimpri News : महापालिकेचे ‘मिशन ॲस्ट्रॉनॉमी’! २.५ कोटी रुपये खर्चून विद्यार्थ्यांसाठी उभारणार अत्याधुनिक प्रयोगशाळा

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सात शाळेत खगोलशास्त्राचे शिक्षण व ज्ञान मिळण्यासाठी शाळांमध्ये अस्ट्रोनॉमी लॅब (अत्याधुनिक सायन्स लॅब) विकसित करण्यात येणार आहे. एका लॅबसाठी ३६ लाखांचा करण्यात येणार आहे. एकूण २ कोटी ५० लाख रूपये खर्च अपेक्षित आहे.महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे शिक्षण व ज्ञान मिळण्यासाठी शाळांमध्ये लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप अस्ट्रोनॉमी लॅब विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध आहे.
त्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालकाच्या २४ सप्टेंबर २०२४ अन्वये तांत्रिक आदेशानुसार मान्यता प्राप्त झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपसचिव यांनी प्रस्तावित कामकाजास २ कोटी ५० लाख रूपये खर्चास प्रशसाकीय मान्यता दिली आहे.महापालिका शाळेत अस्ट्रोनॉमी लॅब विकसित करण्यासाठी निविदा महाटेंडर प्रणालीवर १३ जुलै २०२५ ला प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात तीन पुरवठादार ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. पुण्यातील एज्यूनीडस या एजन्सीची एका शाळातील अस्ट्रोनॉमी लॅबसाठी ३५ लाख ७१ हजार ३०० रूपयांचा लघुत्तम दर स्वीकृत करण्यात आला आहे.
सात शाळांचा खर्च एकूण २ कोटी ४९ लाख ९९ हजार १०० रूपये इतका आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या अकरापैकी सात शाळांमध्ये या लॅब विकसित करण्यात येणार आहेत. एका लॅबमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एकूण ६४ प्रकाराचे प्रकल्प असणार आहेत. शिक्षण विभागाच्या मागणीनुसार मध्यवर्ती भांडार विभागाकडून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.





