Pimpri News | आयटीआय प्रवेशासाठी मुदतवाढ ; मोरवाडी, कासारवाडी, निगडीमध्ये जागा शिल्लक

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – निगडी येथील शासकीय, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) रिक्त जागा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १२ ते २० सप्टेंबर या कालावधीत नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.आयटीआय प्रवेशप्रक्रियेच्या १ ते ४ फेऱ्या व संस्थास्तरीय समुपदेशन फेरीनंतरही काही जागा रिक्त राहिल्या होत्या.
या जागांसाठी मुदतवाढ देण्याची मागणी आयटीआयच्या प्राचार्यानी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांकडे ई-मेलद्वारे विशेष विनंती केली होती. त्यानुसार संचालनालयाने १२ ते २० सप्टेंबर या कालावधीत नव्याने अर्ज करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ३० सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत रिक्त जागा भरण्याची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.
मोरवाडी आयटीआयमध्ये वेल्डर, शिटमेटल वर्क आणि प्लंबर व अन्य ६५ जागांवरील प्रवेश रिक्त आहेत. या जागांसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. तसेच कासारवाडी येथील महिला आयटीआयमधील फॅशन डिझाईन ॲण्ड टेक्नॉलॉजी व कॉस्मेटॉलॉजी व्यवसायातील प्रत्येकी १ जागा, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटरमधील १२ जागा आणि हॉस्पिटल हाउसकीपिंग व्यवसायातील १३ अशा एकूण २७ जागा अद्याप रिक्त आहेत.
या जागांवर नव्याने अर्ज करण्याची शेवटची संधी मुलींसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय निगडी येथील शासकीय आयटीआयमधील ७६ जागा रिक्त आहेत. या ट्रेडसाठीही विद्यार्थ्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
–





