Pimpri News | महापालिकेत बढत्यांचा धमाका ; प्रशासकीय राजवटीत पुन्हा एकदा मोठा निर्णय

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील २२७ अधिकारी, कर्मचार्यांना एकाच वेळी वरिष्ठ पदावर बढत्या देत गणेशोत्सवातच आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी धमाका केला आहे. त्यामध्ये चार सहायक आयुक्त, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यासह विविध पदांचा समावेश आहे.
महापालिकेतील नगरसेवकांचा १३ मार्च २०२२ रोजी कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे मागील साडेतीन वर्षांपासून आयुक्त हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. महापालिका पदोन्नती समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत विविध अधिकारी, कर्मचार्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार बढत्या देण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा आदेश आयुक्त सिंह यांनी काढला आहे.
अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव , कालावधी, सेवाजेष्ठतेनुसार मुख्य माहिती अधिकारी १, सहायक आयुक्त ४, कार्यकारी अभियंता स्थापत्य १, प्रशासन अधिकारी ६, उप अभियंता स्थापत्य ३०, असिस्टट मेट्रन ३, कार्यालय अधिक्षक ८, मुख्य लिपिक ७२, उपलेखापाल २५, लिपिक ६२, वीज तंत्री ३, कनिष्ठ अभियंता ४, आराेग्य निरीक्षक १, सिस्टर इनचार्ज ३, नाईक ४ अशा २२७अधिकारी, कर्मचार्यांना पदाेन्नती देण्यात आली.
प्रशासकीय राजवटीत पाचशे जणांना पदाेन्नती..
सध्यस्थितीत महापालिकेत नगरसेवक नसून प्रशासकीय राजवट सुरू आहे. नगरसेवक असताना अधिकारी, कर्मचार्यांना पदाेन्नतीसाठी विधी समिती, सर्व साधारण सभेच्या मंजुरीनंतरच पदाेन्नती मिळते. यामध्ये बराच कालावधी जाताे, काही वेळा सभा तहकूब हाेतात. अनेक वेळा तर अधिकार्यांना पदाधिकार्यांचे उंबरे झिजवावे लागतात. त्यानंतर पदाेन्नती मिळते. मात्र, प्रशासकीय राजवटीत जलद गतीने अधिकार्यांना पदाेन्नती मिळत असल्याचे दिसून येत आहे. मागील साडेतीन वर्षात सुमारे पाचशे अधिकारी, कर्मचार्यांना पदाेन्नती देण्यात आली आहे.





