Pimpri News | निवडणूक आयोग भाजपसारखं बोलतंय – अरविंद सावंतांचा आरोप

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – निवडणूक आयोगाकडून आमच्यासाठी सगळे पक्ष सारखेच असल्याचे सांगितले जाते. मात्र, राहूल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आयोग उत्तर देत नाही. निवडणूक आयोग व भाजपची भाषा सारखी कशी ?, असा प्रश्न माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, देशात लोकशाही धोक्यात आल्याचे राहूल गांधींनी उघड केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित उध्वश्री पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, आमदार सचिन अहिर, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख संजोग वाघेरे, राष्ट्रवादी (शरद पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, युवासेना अधिकारी चेतन पवार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्रीपदावरून आणि हिंदुत्वावरून उध्दव ठाकरेंवर टीका करणायांना मेहबूबा मुफ्ती, नितीश कुमार, चंद्राबाबू, कसे चालतात ? आम्ही धार्मिक आहोत. पण, धर्मांध नाहीत. प्रभु रामचंद्राचे नाव घेऊन अफुची गोळी देण्याचे काम भाजप करत आहे. राहूल गांधी यांनी उघड केले. ते लोकांना समजायला लागले आहे. आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष गद्दारांना कसे दिले, हेही समजू लागले आहे.
संविधान धोक्यात आणण्याचे काम सुरु असताना संविधान आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वांना मिळून लढावं लागेल. निखार्याच्या मार्गावर चालून देशाच्या पंतप्रधानांना आव्हान फक्त ठाकरे देत असताना त्यांच्यासोबत राहावं लागेल, असेही सावंत म्हणाले.अंबादास दानवे म्हणाले, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर समाजातील काही लोक प्रश्न निर्माण करत असतात. मात्र, उध्दव ठाकरे म्हणजे सर्वोत्तम असून कोरोना काळात त्यांनी सामान्यांसाठी काम केले. सर्वोत्तम शासक म्हणून काम करतानाच त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. मात्र, तरीही ते महाराष्ट्रासाठी उभे राहिले असून लढत आहेत.





