Pimpri News : पवना धरणातून पाण्याचा पहिला विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Pimpri News : यामुळे पवना नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी : मावळ तालुक्यासह पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज (शुक्रवार) सकाळी ९ वाजता पवना धरणातून पाण्याचा पहिला विसर्ग सुरू करण्यात आला. धरणातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचल्याने वाढता साठा नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युतगृहामार्फत ८०० क्युसेक वेगाने पाणी पवना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
धरण परिसरात अद्यापही पावसाचा जोर कायम असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार विसर्ग टप्प्याटप्प्याने ५ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे पवना नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने नदीपात्रात किंवा नदीकाठावर ठेवलेले शेती अवजारे, मोटारपंप, वाहने, जनावरे तसेच इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“पावसाचे प्रमाण आणि धरणातील येवा लक्षात घेऊन विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ अथवा घट करण्यात येईल. त्याबाबतची पूर्वकल्पना वेळोवेळी दिली जाईल. नदी खोऱ्यातील सर्व ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांनी पूर्ण दक्षता बाळगावी,” असे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांनी केले आहे.




