प्रभात वृत्तसेवा पिंपरी – सप्टेंबरनंतर कोरडे दिवस येतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फाेल ठरली. त्यानंतर ऑक्टोबर हिटमुळे पाऊस पडणार नाही, असेही नागरिकांना वाटले होते. पण यंदा पिंपरी चिंचवड शहरावर जणू मेघराजाचं राज्यच स्थिरावलं आहे. सलग सहा महिन्यांपासून अधूनमधून जोरदार पावसाचा मारा सुरूच आहे. रस्त्यांवर साचलेले पाणी, ठिकठिकाणी खड्ड्यांनी भरलेले वाहतूक मार्ग आणि सततच्या ओलसर वातावरणामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अक्षरशः गोंधळ माजला आहे. याच आठवड्यात दिवाळीच्या सणामध्ये भाऊबिजेच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहराला पावसाने अक्षरशः झोडून काढले. या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले. घरांमध्ये ओलावा, दुकानांत पाणी शिरणे आणि सांडपाणी नाल्यांचा ताबा सोडणे अशा समस्या सतत जाणवत आहेत. गणेशोत्सव आणि गौरी-गणपती विसर्जनाच्याही काळात नागरिकांना पावसाचा त्रास सहन करावा लागला. मात्र दिवाळीच्या सणामध्ये पाऊस आल्याने त्याचा थेट परिणाम दुकानदारांच्या व्यावसायावर झाला आहे. पालिका प्रशासनाकडून जलनिकासीसाठी उपाययोजना केल्या गेल्याचे सांगितले जात असले, तरी नागरिकांचा प्रश्न कायम आहे, “हा पाऊस थांबणार तरी कधी?” सततच्या पावसामुळे शहरातील पाणीसाठे आणि बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असले, तरी नागरी जीवनातील असुविधा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिक आता आशेने विचारत आहेत “भोलानाथा, आता तरी ऊन कधी पडणार?” महापालिका प्रशासनाचे म्हणणे.. “सततच्या पावसामुळे काही भागांमध्ये जलनिकासी अडथळे निर्माण झाले आहेत. नालेसफाईसाठी आणि पाणी उपसण्यासाठी यंत्रणा सतत कार्यरत आहे. नागरिकांनी तातडीच्या अडचणींसाठी महापालिकेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा,” असे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांचे हाल : – रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव मुठीत. – पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी. – घरांच्या भिंतींना ओलावा, विजेच्या उपकरणांमध्ये बिघाड. – लहान मुले, महिला व वृद्धांना प्रवासात अडचणी. – रस्ते व पदपथांवर चिखल व घाण साचलेली. – पावसाचे पाणी आणि रस्त्यावरील ऑइलमुळे वाहने घसरून पडतात.