Pimpri News | ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ ; महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचा वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या उपक्रमाला यंदा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अंदाजपत्रकासाठी महापालिकेच्या आठ प्रभागांमधून २ हजार ७०० पेक्षा जास्त नागरिकांचे अभिप्राय प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी या उपक्रमात २ हजार २७९ नागरिक सहभागी झाले होते. त्या तुलनेत यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२५ रोजी या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर नागरिकांना ऑनलाईन अभिप्राय देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. नागरिकांनी देखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत अभिप्राय नोंदवले. या अभिप्रायांमध्ये रस्त्यांचे नूतनीकरण, फूटपाथ बांधकाम, उद्यान विकास, जलनिस्सारण सुधारणा आणि नागरी सुविधा यांसह विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे.
नागरिकांनी सूचवलेल्या कामासाठी त्यांच्या प्रभागातून वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या १० टक्के रक्कमेची तरतूद केली जाते. त्यानुसार अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये मागील वर्षी प्राप्त झालेल्या नागरिकांच्या सूचनांचा विचार करून आणि कामांचा प्राधान्यक्रम ठरवून १३६ कोटी ९८ लाख इतक्या निधीची तरतूद ४९९ कामांसाठी करण्यात आली होती. ज्यामध्ये रावेत येथील नवीन शाळा इमारत, पुनावळे येथील प्रमुख रस्त्याचे काम अशा विविध कामांचा समावेश होता.यंदाही या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.





