Pimpri News | संस्कृती, परंपरेचा जल्लोष ; लोहगडच्या युनेस्को मान्यतेनंतर मावळात आनंदसोहळा

प्रभात वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे – लोहगड किल्ल्याची युनेस्को जागतिक वारसा यादीत नोंद झाल्याच्या आनंद साजरा करण्यात आला. प्रसंगी लायन्स क्लब तळेगाव व फ्रेंड्स ऑफ नेचर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.८) भव्य रॅली काढण्यात आली.ढोल-ताशांचा गजर, मानबिंदू पथक, विविध बॅनर्स-फलक आणि घोषणांसह रॅलीला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. रॅलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सज्ज घोडेस्वार, घोड्यावर आरूढ होऊन सहभागी झाले होते. हा देखावा पाहून नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
ही रॅली तळेगाव रेल्वे स्टेशनपासून फ्रेंड्स ऑफ नेचर निसर्ग अभ्यासिका, यशवंत नगरपर्यंत काढण्यात आली होती. लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष राजेंद्र झोरे यांनी सांगितले की, “मावळ परिसरातील शौर्य, संस्कृती व परंपरेचे प्रतीक असलेल्या लोहगड किल्ल्याचा युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश हा आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद क्षण आहे.” फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष डॉ. गणेश सोरटे यांनी मनोगत व्यक्त केले, तर महेश महाजन यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
या कार्यक्रमात लोहगड विकास मंचाचे पदाधिकारी सचिन टेकवडे व शिवव्याख्याते, इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोऱ्हाडे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर डॉ. बोऱ्हाडे यांनी आपल्या व्याख्यानातून लोहगडचा समृद्ध इतिहास उलगडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपर्णा गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन लष्करे यांनी मानले.





