Pimpri News | मतदान चोरांवर घणाघात! देहूरोडमध्ये काँग्रेसचा आक्रमक मोर्चा

प्रभात वृत्तसेवा
देहूरोड – मतदार यादीतील कथित घोटाळा, निवडणूक आयोगावर दबाव आणून गैरमार्गाने सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न, असे गंभीर आरोप करत देहूरोड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी (दि. २०) निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत घेऊन घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार व प्रदेश व जिल्हा काँग्रेसच्या सूचनेनुसार शहर ब्लॉक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास प्रारंभ झाला. स्वामी विवेकानंद चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, मेन बाजारपेठ, भाजी मंडई मार्गे मोर्चा गावकामगार तलाठी कार्यालयाजवळ पोहोचला. यावेळी सुभाषचंद्र बोस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले. मतदान चोर, खुर्ची सोडच्या घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला.
मोर्चामध्ये माजी नगरसेवक गोपाळ तंतरपाळे, अल्पसंख्याक अध्यक्ष गफूर शेख, मोहन राऊत, बबन टोम्पे, युवकाध्यक्ष मलिक शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिवसेना (उबाठा)चे रमेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे राजू कदम तसेच भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले.
मोर्चाच्या शेवटी मतदार यादीतील घोटाळ्याची सखोल चौकशी करून खुलासा करण्याच्या मागणीचे निवेदन तलाठी सुदर्शन पाटील यांना देण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वावळे व गोपनीय पोलीस अधिकारी प्रशांत वाबळे उपस्थित होते.





