Pimpri News: अकरा जणांना डेंग्यूची लागण २७ हजार रुग्णांना हिवताप
Pimpri News: डेंग्यूंचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिकांना स्वच्छता राखणे व दक्षता घेण्याचे आवाहन

Pimpri News: – पावसाळा सुरु होताच शहरात थंडी-तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होते. यंदा देखील जून महिन्यापासूनच डेंग्यूचे रुग्ण आढळत असून जूनमध्ये दोन जणांना तर जुलै महिन्यामध्ये ११ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. यावर्षी जुलै महिन्यात हिवतापाचे २७ हजार ७२ रुग्ण आढळले आहेत. तर, जानेवारी ते मे या दरम्यान एकाही व्यक्तीला डेंग्यूची लागण झाली नव्हती. मात्र, आता डेंग्यूंचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिकांना स्वच्छता राखणे व दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पावसाळ्यामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यासारखे आजार पसरतात. थंडी, ताप, अंगदुखी यासारखी लक्षणे असून जुलै महिन्यामध्ये २७ हजार ७२ जणांना तीव्र थंडी ताप आला आहे. त्यामध्ये डेंग्यू सारख्या आजाराने त्रस्त असलेल्या डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या जुलै महिन्यात तब्बल ३८९ आहे. ही संख्या जून महिन्यात २५२ होती. जुलै महिन्यात ३८९ रुग्णांपैकी ११ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळले.
जानेवारीपासून सात महिन्यात फक्त जून महिन्यात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर जुलैमध्ये मोठी वाढ झालेली आहे. पावसाळ्यामध्ये ठिक-ठिकाणी पाण्याचे डबके साचतात. या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या किटकजन्य आजारांची साथ येते. जून महिन्याच्या तुलनेमध्ये जुलै महिन्यामध्ये थंडी ताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने वैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे.
मलेरियाचा एक रुग्ण
दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यावर मलेरियाचे रुग्णही अधिक आढळतात. यंदा जून व जुलै महिन्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. जानेवारीपासून आजअखेर मलेरियाचे १५ रुग्ण आढळले आहे. त्यामध्ये जानेवारीमध्ये १, मार्चमध्ये ४, एप्रिलमध्ये ३, मे मध्ये ५ रुग्ण आढळले होते. डेंग्यू आणि मलेरिया या दोन्ही आजारांची रुग्णसंख्या वाढत आहे.
‘डेंग्यूची संख्या ११ असली तरी आटोक्यात आहे. साथीच्या आजारांसाठी वैद्यकीय व्यवस्था देखील सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी थंडी-ताप अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या मनपा रुग्णालयातून तपासणी करून घ्यावी.’ – डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी.
Koregaon: कृष्णेचे पाणी भाडळे, नलवडेवाडी खोर्यात खळखळणार





