Koregaon: कृष्णेचे पाणी भाडळे, नलवडेवाडी खोर्यात खळखळणार
Koregaon आमदार चव्हाण म्हणाले, कोरेगाव तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी आमदार महेश शिंदे घेत असलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. पाणी योजनांचे भूमिपूजन होत असताना पावसाने लावलेली हजेरी म्हणजे भगवंताचा आशीर्वाद आहे. या योजना लवकरच पूर्ण होऊन, शेतकर्यांच्या पुढील पिढ्या समृद्ध होतील.

Koregaon: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून, महाराष्ट्रातील शेतकर्यांचे जीवनमान उंचावले आहे. पूर्वीच्या सरकारने शेतकर्यांना झुलवत ठेवले. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेतून कृष्णामाईचे पाणी अवघ्या 13 महिन्यांत भाडळे आणि नलवडेवाडी खोर्यात खळखळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मी स्वत: जलपूजनाला येईन, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.
आमदार महेश शिंदे यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लागलेल्या भाडळे आणि नलवडेवाडी उपसा सिंचन योजना आणि चिलेवाडी-रेडेघाट-कोरेगाव या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार चव्हाण बोलत होते. आमदार महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार धैर्यशील कदम, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सौ. प्रिया शिंदे, भाजपचे प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, सोळशी येथील शनैश्वर देवस्थानचे नंदगिरी महाराज, सुनील काटकर, जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे, अमित चव्हाण, सौ. सारिका फाळके, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, राहुल कदम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, तालुकाध्यक्ष नीलेश यादव, कोरेगाव शहराध्यक्ष दीपक फाळके, विजयराव घोरपडे, विलास पवार, चंदूकाका पवार, धनाजी मोहिते, धनसिंग कदम, कोरेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी नगरसेवक सचिन बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, संतोष बर्गे, अजित बर्गे, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
आमदार चव्हाण म्हणाले, कोरेगाव तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी आमदार महेश शिंदे घेत असलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. पाणी योजनांचे भूमिपूजन होत असताना पावसाने लावलेली हजेरी म्हणजे भगवंताचा आशीर्वाद आहे. या योजना लवकरच पूर्ण होऊन, शेतकर्यांच्या पुढील पिढ्या समृद्ध होतील.
आमदार शिंदे म्हणाले, कोरेगाव तालुक्याचा पाणी प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनीच सोडवला आहे. जिहे-कठापूर योजनेसाठी त्यांनी 2014 साली 2200 कोटी रुपयांचा निधी दिला. कृष्णा खोरे विकास महामंडळाचा उपाध्यक्ष झाल्यानंतर तब्बल दोन टीएमसी पाणी या भागासाठी मिळवले आहे. कोरेगाव तालुक्यातील 22 पुनर्वसित गावांना पाणी देऊ शकलो. भाडळे आणि नलवडेवाडी योजना पूर्ण झाल्यावर शेतकरी साडेबावीस लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन घेणार आहेत.
डॉ. प्रिया शिंदे यांनी म्हणाल्या, भाडळे भागाचा दुष्काळ कायमस्वरुपी हटवायचे आमदार महेश शिंदे यांनी पाहिलेले स्वप्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे पूर्ण होत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात आरोग्य संवर्धनाचे काम सुरू आहे. विषमुक्त स्वयंपाकगृह उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संपूर्ण जिल्हा कर्करोग आणि मधुमेहमुक्त करण्याचा निर्धार आहे. सुनील खत्री म्हणाले, आमदार महेश शिंदे यांच्या नियोजनामुळे तालुका सुजलाम् सुफलाम् झाला आहे. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. महिला पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. प्रदीप कदम यांनी स्वागत केले. भरत मुळे यांनी आभार मानले.
विरोधकांवर जोरदार टीकास्त्र
कार्यक्रमस्थळी मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर उपस्थितांनी ‘एकच वादा महेशदादा’, ‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. हा धागा पकडून आमदार महेश शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. जिहे-कठापूर योजनेवरुन विरोधकांनी केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष केल्याने तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देऊ शकलो, असे ते म्हणाले.
आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर स्तुतिसुमने
भाजप आणि मुख्यमंत्र्यांमुळे कोरेगाव मतदारसंघाचा विकास झाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रवींद्र चव्हाण यांनी मतदारसंघाला भरभरुन निधी दिला. राहुलदादा बर्गे यांना विचारा, ज्या ज्या वेळी आम्ही आ. चव्हाण यांच्याकडे गेलो, तेव्हा त्यांनी शंभर कोटी रुपयांहून कमी निधी दिला नाही. त्यामुळे कोरेगाव, कठापूर, भाडळे येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. सबकुछ आ. रवींद्र चव्हाण असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.





