Pimpri News : सुरक्षा रामभरोसे! फक्त ७८ दुकानांना परवानगी, शहरभर शेकडो फटाके स्टॉल

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – दिवाळी सणाची चाहूल लागताच पिंपरी-चिंचवड शहरात फटाक्यांच्या दुकानांची रेलचेल वाढली आहे.शहरातील मुख्य बाजारपेठांपासून रहिवासी परिसरांपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेकडो फटाक्यांची दुकाने उभी राहिली आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे शहरात हजारो दुकाने सुरू असताना अधिकृत परवानगी केवळ ७८ जणांनाच देण्यात आली असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.
दरवर्षी दिवाळीच्या काळात शहरातील भोसरी, चिंचवड, पिंपरी, सांगवी, आकुर्डी, निगडी, संत तुकारामनगर परिसरात अवैधरित्या फटाक्यांची दुकाने उभी राहत असतात. यावर्षीही त्याला अपवाद नाही. संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या समोरच रस्त्यावर जवळपास ३० दुकाने लावली गेली आहेत. रहिवासी भागात अशा प्रकारे उघडपणे दुकाने उभारल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अग्निशमन विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यांच्या दुकानांना आग लागल्याची गंभीर घटना शहरात आतापर्यंत घडलेली नाही. मात्र, याचा अर्थ असा नाही की भविष्यातही अशी दुर्घटना होणार नाही. कारण फटाक्यांचा स्फोटक स्वरूपाचा साठा असल्याने थोडीशी बेपर्वाईही मोठा धोका निर्माण करू शकते. अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे की, फटाक्यांच्या दुकानांवर कारवाई करण्याचे अधिकार त्यांच्याकडे नसून केवळ पोलीस विभागाकडेच आहेत. त्यामुळे अवैध दुकाने उभारणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांचा पुढाकार आवश्यक आहे.
धोकादायक पद्धतीने व्यवसाय..
दरवर्षी फटाक्यांच्या बेकायदेशीर विक्रीमुळे शहरातील बाजारपेठांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परवानगीशिवाय चालणारी दुकाने ही ज्वलनशील मालाच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र यंदाही अवैध विक्री वाढल्याने पोलिसांना दिवाळीत अतिरिक्त ताणाचा सामना करावा लागणार आहे.
फटाक्याच्या व्यवसायात नफ्याचे मार्जिन खूप अधिक असल्याने अनेकजण या सीझनल व्यवसायात उतरले आहेत. परंतु व्यवसाय करताना हा व्यवसाय धोकादायक तर ठरणार नाही ना? याची काळजी घेतली जात नाही. सांगवी परिसरात तर चक्क खाऊ चौपाटीला लागून फटाक्याचा स्टाॅल उभारण्यात आला आहे. येथे मोठ्या संख्येने खाद्य व्यावसायिक व्यवसाय करत आहेत. प्रत्येक व्यावसायिकाची गॅस शेगडी बहुतेक वेळ सुरू असते. तसेच भाजीच्या व इतर दुकानांना चिटकूनही फटाका स्टाॅल उभारण्यात आले आहेत.
फटाक्यांची दुकाने लावताना घ्यावयाची काळजी..
– फटाक्यांच्या दुकानासाठी अग्निशमन विभाग व पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
– दुकाने रहिवासी भागात किंवा पेट्रोल पंप, वीजतारा, गॅस गोडाऊनपासून दूर अंतरावर असावीत.
– दुकानात कोणत्याही प्रकारचा उघडा दिवा, अगरबत्ती, सिगारेट, गॅस सिलिंडर ठेवू नये.
– फायर एक्स्टिंग्विशर (अग्निशामक यंत्र), पाण्याच्या बादल्या, वाळूचे पोते जवळ ठेवावेत.
– फटाके थंड, कोरड्या आणि हवेशीर जागेत साठवावेत.
– ग्राहकांनी लहान मुलांना एकटे फटाके खरेदीस पाठवू नये आणि फटाके पेटवताना दूर उभे राहावे.
– दुकानात ‘धुम्रपान निषिद्ध’ व ‘आगीपासून सावध’ अशा सूचना लावाव्यात.
– अवांछित गर्दी टाळावी, गाड्या किंवा दुचाकी दुकानासमोर पार्क करू नयेत.
– परवानाधारक विक्रेत्यांकडूनच फटाके खरेदी करावेत.
– कोणत्याही आगीची घटना घडल्यास १०१ किंवा ९९२२५०१४७५ या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा.
“यंदाच्या वर्षी पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतील ७८ फटाक्यांच्या दुकानांना अधिकृत परवानगी दिली आहे. या परवानगी देताना सुरक्षा विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन फटाक्याची विक्री करणा-या दुकानदारांना केले आहे.”
– उमेश ढाकणे, सहायक आयुक्त, अग्निशामक विभाग





