Pimpri: ३०० कोटींची जमीन संस्थेला देणार भेट; शैक्षणिक संस्था उभारणार मिनी विद्यापीठ

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होऊ लागल्याने शहर आणि आसपासच्या परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. एकीकडे जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना दुसरीकडे सरकारने पिंपरी चिंचवड शहरातील बाजारभावाप्रमाणे सुमारे 300 कोटींची जमीन एका शैक्षणिक संस्थेला निशुल्क देण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी त्या जमिनीवर असलेले आरक्षणही बदलण्यात येणार आहे.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम ही संस्था भटक्या विमुक्त आणि मागास भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे आणि मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करते. या संस्थेला ही जमीन देण्यात येणार आहे. सध्या चिंचवडगाव येथील गावडे जलतरण तलावाजवळ नदीकाठी ही आश्रमशाळा आहे.
ही आश्रमशाळा पद्मश्री गिरीष प्रभुणे हे चालवितात. मात्र ही जागा निळ्या पूर रेषेत येत असल्याने त्याठिकाणी आश्रमशाळेचे विस्तारीकरण करण्यासाठी बांधकाम करता येत नाही. त्यामुळे या संस्थेकरिता पर्यायी जागेचा शोध सुरू होता. अवघ्या काही दिवसांपासून मंत्रालय पातळीवरून या संस्थेला जागा देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
या जागेची झाली निवड
मोशी येथील मोशी येथील गट नंबर 646 (जुना गट नंबर 649) व गट नंबर 464 (जुना गट नंबर 462) मधील क्षेत्र 14 ते 15 हेक्टर (37.5 एकर) जागा क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम चिंचवड या संस्थेला देण्याचा निर्णय जवळपास झाला असून येत्या काही दिवसांमध्ये या निर्णयावर मंत्रीमंडळाचे शिक्कामोर्तब होणार आहे.
असे आहे आरक्षण
सध्या ही जागा गायरान म्हणून ओळखली जाते. यापूर्वीच्या विकास आराखड्यात या जागेवर सफारी पार्क, पार्किंग आणि मनपा उपयोग असे आरक्षण होते. मनपा उपयोगामध्ये शहरातील कच-याची समस्या लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापन करण्यात येणार होते. मात्र महापालिकेने नव्याने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार या जागेवर आता शासकीय रुग्णालय, पार्किंग आणि रिक्रिएशनल सेंटर असे आरक्षण आहे. मात्र नवीन विकास आराखड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे जुनेच आरक्षण अद्याप कायम आहे.
महावितरणला मागणीच्या निम्मी जागा
पिंपरी चिंचवड शहर ही उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. येथीली वाढत्या लघु व मध्यम कारखान्यांची संख्या आणि वाढते नागरीकरणामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे विजेच्या मागणीही वाढ होत आहे. त्यामुळे मोशी येथील याच जागेवर 15 एकर जागा महावितरणला सब स्टेशन उभारणीसाठी द्यावी, अशी मागणी होती. मात्र महावितरणची ही मागणी महापालिकेने अर्धवटच पूर्ण केली आहे. 15 एकर जागेची आवश्यकता असतानाही केवळ सात एकर जागा महापालिका महावितरण कंपनीला देणार आहे.
आरक्षणही बदलणार
मोशी येथील घनकच-याचे आरक्षण बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे समजते. कोणतेही आरक्षण बदलायचे असल्यास शासनाचीही परवानगी लागते. मात्र ही आरक्षित जागा क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थेला देण्याचा शासन घेण्याच्या तयारीत असल्याने लवकरच आरक्षण बदल होणार आहे.
जागेची किंमत किती
सध्या मोशीमध्ये रोडटच जागा असल्यास प्रति चौरस फूट चार हजार रुपये, मुख्य रस्त्यापासून थोडी आत जागा असल्यास परंतु जाण्यासाठी रस्ता असल्यास प्रति चौरस फूट तीन हजार रुपये, त्यापेक्षा आणखी थोडी आत जागा असल्यास कमीत कमी प्रति चौरस फूट अडीच हजार रुपये असा जागेचा दर आहे. महापालिका क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थेला 37.5 एकर जागा देणार आहे. जरी या जागेची किंमत दोन हजार प्रति चौरस फूट याप्रमाणे धरली तरी आजच्या बाजारभावानुसार या जागेची किंमत जवळपास 300 कोटी रुपये इतकी होत आहे. मात्र ही सर्व जागा महापालिका मोफत देणार आहे.
अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष
शहरातील हाफकिन या निमशासकीय संस्थेची जागा बिल्डरला देण्याचा विचार शहरातील काही नेत्याचा होता. मात्र शनिवारी (दि. 20) झालेल्या जनसंवादच्यावेळी अजित पवार यांनी ही जागा बिल्डरला देण्याच्या प्रस्ताव झुरळासारखा उडवून लावला. त्यामुळे मोशीतील एवढी मोठी जागा क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थेला देण्यासाठी अजित पवार अनुकूल होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘कित्येक हजार वर्षांपूर्वी भारतीयांनी कपडे तसेच अनेक महत्त्वपूर्ण शोध लावले. याच परंपरेत पारधी, बेलदार आणि इतर समाजांनीही लेण्या कोरून, वेगवेगळे उपक्रम राबवून आपला ठसा उमटवला आहे. दुर्दैवाने हा समाज दीर्घकाळ मुख्य प्रवाहापासून दूर राहिला. आता आमच्या शाळेतून या समाजातील अनेक मुले डॉक्टर, इंजिनिअर, बीबीए सारखे कोर्स पूर्ण करून प्रगतीच्या मार्गावर चालली आहेत, ही आनंदाची बाब आहे. या समाजाला अधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडे 150 एकर जागेची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 37 एकर जागा शासन व महापालिकेकडून मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे समाजाच्या शिक्षण, संस्कार आणि विकासासाठी नवे दालन खुले होईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.’- गिरीश प्रभुणे, संस्थापक, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम
‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थेने आमच्याकडे जागेची मागणी केली होती. त्याप्रमाणे आम्ही त्यांना जागा देत आहोत.’ – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी





