Pimpri : पवना बंद जलवाहिनीचे काम सुरू झाले असते तर

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराला सद्यस्थितीत एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसेंदिवस पाण्याची गरज वाढत आहे. असे असताना शहराला पवना धरणातून बंद जलवाहिनीने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे.
नुकतीच या कामाच्या निविदा प्रक्रियेबाबतची बैठक झाली. माझ्या काळात निविदा काढून जायचे होते, मात्र ते राहिलेच अशी खंत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केली. सिंह यांची मंगळवारी नाशिक येथील कुंभमेळा येथे बदली झाली आहे. त्यानंतर बुधवारी (दि. ८) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
आयुक्त सिंह म्हणाले, सध्या शहराला पवना व आंध्रा धरणामधून पाणीपुरवठा होत आहे. भविष्यात आणखी पाण्याची गरज भासणार आहे. भामा आसखेडचे काम देखील प्रगतीपथावर आहे. ठोकरवाडी धरणाचे पाणी देखील मिळणार आहे. त्यासाठी माझ्या कार्यकाळात किमान सरकारी दरबारी त्याचे बीज रोवण्यात यश आले. त्यासाठी वेळ लागेल. मात्र, त्यापूर्वी मुळशी धरणातील पाणी आणण्यासाठी हालचाली सुरू आहे.
मुळशी धरणातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी ९.५० टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी आपल्याला किमान ६.५० टीएमसी पाणी मिळावे हा दावा असणार आहे. पवना बंद जलवाहिनीचे काम देखील येत्या चार महिन्यात सुरू होईल. पुढच्या तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल. त्याचप्रमाणे शहरासाठी मागच्या तीन वर्षात भरीव काम करण्याची संधी मिळाली. शिक्षणात चांगले काम करता आले.
तळवडे बायोडाव्हर्सिटी या शहरातील सर्वोत्तम प्रकल्पाचे काम सुरू आहे. हरीत सेतू म्हणजे अर्बन स्ट्रीट या कामावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली मात्र, शहरासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. परदेशात देखील हीच थीम वापरण्यात येत आहे. आपल्याला देखील खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीकडे वळावे लागेल. शहराचा विकास आराखडा योग्य केला आहे. तो रद्द होईल असे वाटत नसल्याचा दावा सिंह यांनी केला.
तर कुदळवाडी येथील कारवाईबाबत बोलताना ते म्हणाले, डोक्याने विचार केला तर कुदळवाडीची कारवाई योग्यच होती. मात्र, मनात तेथील अनेकांची दुकाने, घरे जात आहेत याचे देखील दु:ख होते. वाकड येथील डीटीआर प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. मात्र, तेव्हा वेळ खराब होती. पण मी तेव्हाही योग्य होतो आणि आजही त्याबाबत योग्यच आहे. तेथील प्रकल्प पाहण्यासाठी आज अनेक ठिकाणाहून लोक येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांची नाराजी नाही
पालकमंत्री अजित पवार यांना प्रभागरचनेमध्ये धक्का बसला आहे. त्यांनी बदली केली का? असे विचारले असता सिंह म्हणाले, पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत माझे खूप चांगले संबंध आहेत. साताऱ्यापासून मी त्यांच्यासोबत काम केले आहे. शहरामध्ये काय करायचे आणि काय नाही याबाबत त्यांची भूमिका खूप स्पष्ट असते. त्यांना शहरातील गल्ली ना गल्ली माहीत असून प्रत्येकाशी त्यांचा संपर्क आहे. त्यांची नाराजी नसून कार्यकाळ संपला आहे त्यामुळे बदली झाली.
विकासाच्या मुद्द्यावर हे एकत्र!
पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणी एकमेकांचे विरोधक असले तरी शहरातील एखाद्या विकासाच्या मुद्द्यावर ते एकत्र येत असल्याचे अनुभवले आहे ही चांगली गोष्ट आहे. पुढे शहराच्या विकासाची धाव खूप मोठी असणार आहे. मात्र, तेवढी आर्थिक रसद पालिकेकडे नसेल. त्यामुळे कर्जाचा आधार घ्यावा लागेल. महापालिका आता पूर्वीसारखी श्रीमंत राहिली नसल्याचे आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले.





