Pimpri: मुक्या जीवासाठी देवदूत धावले! चिखलीत १२५ फूट खोल विहिरीतून श्वानाची सुखरूप सुटका
Pimpri: तब्बल ५ तासांचे थरारक बचावकार्य ; केंद्र अधिकारी ऋषिकांत चिपाडे स्वतः उतरले विहिरीत

पिंपरी – भीतीने थरथरणारा, भुकेने व्याकुळ झालेला आणि जगण्याची आशा सोडलेला एक मुका जीव… दुसरीकडे त्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव मुठीत धरून १२५ फूट खोल अंधाऱ्या विहिरीत उतरलेले अग्निशामक जवान! चिखलीतील मोरेवस्ती परिसरात मंगळवारी (दि. २३ जून) असाच एक श्वास रोखून धरायला लावणारा थरार पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने एका श्वानाची सुखरूप सुटका केली. हा मुका जीव सुरक्षित बाहेर येताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात जवानांच्या संवेदनशीलतेला दाद दिली.
मंगळवारी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी मुख्य अग्निशमन नियंत्रण कक्षात चिखली मोरेवस्ती येथील एका विहिरीत श्वान पडल्याची वर्दी आली. घटनेचे गांभीर्य ओळखून नियंत्रण कक्षाने तातडीने कुदळवाडी आग वर्दीवरून तळवडे अग्निशमन पथकाला घटनास्थळी रवाना केले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ती विहीर अंदाजे १०० ते १२५ फूट खोल होती. विहीर वापरात नसल्याने तिच्या सभोवताली दाट, काटेरी झाडेझुडपे वाढली होती, तर आत मोठ्या प्रमाणावर कचरा आणि पाणी साचले होते.
त्यातच हे बचावकार्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे वरून दगड, सुक्या फांद्या आणि काचेचे तुकडे विहिरीत पडण्याचा धोका निर्माण झाला होता.
अग्निशमन पथकाने एक्स्टेन्शन लॅडर आणि रेस्क्यू रोपच्या सहाय्याने अत्यंत सावधगिरीने विहिरीत उतरून मोहीम सुरू केली. मात्र, विहिरीत अडकलेला श्वान प्रचंड घाबरला होता. स्वसंरक्षणाच्या भावनेतून तो सतत हालचाल करत जवानांना चकवा देत होता.
तरुण जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करण्यासाठी ‘तळवडे अग्निशमन केंद्र अधिकारी’ ऋषिकांत चिपाडे यांनी स्वतः विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला.
चिपाडे यांनी अत्यंत संयमाने, हळुवारपणे त्या श्वानाला विश्वासात घेतले. तब्बल ५ तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या श्वानाला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात यश आले. पाच तासांच्या मृत्यूशी सुरू असलेल्या झुंजीतून सुटून जेव्हा तो श्वान बाहेर आला, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
“आपत्ती कोणतीही असो, मानवी जीवासोबतच मुक्या जीवांचे रक्षण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग सदैव तत्पर आहे.” – ऋषिकांत चिपाडे (केंद्र अधिकारी, तळवडे)
Fire Department : संकटकाळी अधिकारी दिसेनात; अग्निशमन विभागात समन्वयाचा अभाव





