Pimpri : शासकीय विश्रामगृह बनले तळीरामांचा अड्डा !

खालापूर : खोपोली शहरातील शासकीय विश्रामगृह हे मागील अनेक वर्षांपासून बंदावस्थेत आहे. अंधाराचा फायदा घेत मद्य प्राशन करणाऱ्या तळीरामांसाठी हे विश्रामगृह हक्काची जागा बनले असून इथे अनेक गैरप्रकार होत असल्याची चर्चा आहे. मागील आठवड्यात मुंबईहून पुण्याकडे प्रवास करीत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे फ्रेश होण्यासाठी खोपोलीत थांबले असता शासकीय विश्रामगृह बंद असल्याने त्यांची मोठी पंचाईत झाली होती. यामुळे बंद असलेल्या व दूरवस्था झालेल्या खोपोलीतील या शासकीय विश्रामगृहाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
खोपोलीतील विश्रामगृहाची संरक्षक भिंत ढासळलेल्या अवस्थेत आहे. तसेच विश्रामगृहाचे लोखंडी प्रवेशद्वाराला मोठमोठे दगड लावून आधार देण्यात आला आहे. याशिवाय विश्रामगृह परिसर पालापाचोळा व कचऱ्याने भरून गेला आहे. याठिकाणी खानसामा, सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी इमारतीचा गैरवापर होत असल्याचे बोलले जाते. एकीकडे खोपोलीत जागेचे भाव गगनाला भिडलेले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील ह्या अडीच एकर जागेतील विश्रामगृह मात्र मरणासन्न अवस्थेत आहे.
खोपोलीतील विश्रामगृहाचा इतिहास
ब्रिटीशांनी मुंबई-पुणे मार्ग तयार करताना बोरघाटाचा अवघड टप्पा, खंडाळा बोगदा तयार करताना मुक्कामासाठी खोपोलीची निवड केली होती. त्यावेळी ब्रिटीश अधिकाऱ्यांना विश्रांतीसाठी डाक बंगला तयार करण्यात आला होता. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत खोपोली शहरात मोक्याच्या ठिकाणी अडीच एकर जागेत सध्याचे विश्रामगृह आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या या विश्रामगृहाची सध्या दूरवस्था झाली आहे.
अजितदादांची झाली पंचाईत
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी असल्याने मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने जात होते. त्यावेळी अजित पवार यांनी खोपोलीत शासकीय विश्रामगृह येथे फ्रेश होण्यासाठी वाहनांचा ताफा थांबविण्याचे आदेश दिले. परंतु शासकीय विश्रामगृह बंदावस्थेत असल्याने अजितदादांची मोठी पंचायत झाली. अखेर रात्री साडेदहाच्या दरम्यान अजित पवारांच्या वाहनाचा ताफा थेट खोपोली पोलीस ठाण्यात पोहचला. तिथे फ्रेश होऊन पवार पुढे मार्गस्थ झाले.





