पिंपरी : ‘गणेश विसर्जन मूर्ती संकलन आपल्या दारी’

महापालिकेचा करोनाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम
पिंपळे गुरव – करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने घाटावरील गणपती विसर्जनास बंदी घातली आहे. परंतु नागरिकांना गणपती विसर्जनासाठी इतरत्र जायला लागू नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत “गणेश विसर्जन मूर्ती संकलन आपल्या दारी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका प्रशासनाला केलेल्या सूचनेनुसार गणेश विसर्जन मूर्ती संकलन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे. त्यासाठी त्यांना नदी घाटावर जाण्याची गरज पडणार नाही.
स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने महापालिकेचा “गणेश विसर्जन मूर्ती संकलन आपल्या दारी’ हा रथ प्रभागवार फिरून गणेशमूर्तींचे संकलन करणार आहे. संकलन केलेल्या मूर्तींचे विसर्जनाची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे. प्रदूषणमुक्त विसर्जन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन योग्य प्रकारे व्हावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ही सुविधा पाचव्या, सातव्या, नवव्या तसेच अनंत चतुर्दशी या दिवशी देण्यात येणार आहे. तसेच परिसरातील सार्वजनिक गणपती मंडळांच्या मंडपात गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वीकारण्यात येतील.
या ठिकाणी होणार मूर्ती संकलन
प्रभाग क्रमांक 29 पिंपळे गुरव येथे पुढील ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. रामकृष्ण मंगल कार्यालय, माध्यमिक विद्यालय शाळा इमारत, पिंपळे गुरव बस स्टॉप, बुद्ध विहार, सृष्टी चौका, स्प्रिंग बिल्डींग, डॉमिनोझ पिझ्झा खालील पार्किग, काशिद पार्क, बीआरटी रोड. प्रभाग क्र. 30 दापोडी येथे भगतसिंग शाळा, फुगेवाडीकरिता लोकमान्य टिळक शाळा तसेच कासारवाडीकरिता ह प्रभाग कार्यालय. प्रभाग क्र. 32 सांगवीकरिता अहिल्यादेवी शाळाप्रभाग क्रमांक 31 नवी सांगवी, पिंपळे गुरवकरिता पी. डब्ल्यू. डी. मैदानावरील बॅडमिंटन हॉल, उद्याना समोरील जुनी मनपा शाळा पिंपळे गुरव या ठिकाणी महापालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे.




