Pimpri : प्लॅस्टिकच्या टाक्यांची मागणी वाढली !

कान्हे : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली असताना पाण्याची मागणी देखील वाढली आहे. सण, उत्सव, यात्रा-जत्रा यामुळे पाण्याची मागणी अधिक वाढली आहे. परंतु शहरी भागात आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा होताना दिसत नाही. यासह अनेकदा पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत होते किंवा अपूरा पाणीपुरवठा होतो. अशावेळी पाण्याचे नियोजन करण्यासाठी व घरातील पाण्याची गरज भागविण्यासाठी नागरिक पाणी साठविण्यावर भर देत आहेत.
उन्हाळ्यामुळे पाण्याच्या वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी कमी पडू लागले आहे. यामुळे आपसूकच पाण्याची साठवणूक करण्यासाठी नागरिक प्लॅस्टिकचे ड्रम, टाकी यांची खरेदी करू लागले असून बाजारात प्लॅस्टिकच्या टाक्या, ड्रम यांची मागणी वाढल्याचे दिसत आहे.
सध्या बाजारात शंभर लीटर, दोनशे लीटर, तीनशे लीटर, पाचशे लीटरच्या टाक्या, तर पन्नास, शंभर, दोनशे लीटरचे ड्रम उपलब्ध असल्याचे दिसतात. त्यातही तीनशे, पाचशे ते एक हजार लीटर पाण्याची साठवण क्षमता असलेल्या प्लॅस्टिक टाक्यांना मागणी अधिक आहे. या टाक्या घरात बसविण्याची लगबग सुरू असून दुसरीकडे टाकी बसविणे शक्य नसणारे नागरीक ड्रम खरेदी करून तात्पुरती गरज भागविण्याचा पर्याय स्वीकारत आहेत.
नागरिकांना घरगुती वापरासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी पाण्याच्या टाकीची किंवा ड्रमची गरज भासत आहे. यामुळे तीनशे, पाचशे व एक हजार लिटर पाण्याची साठवण क्षमता असलेल्या प्लॅस्टिकच्या टाक्या अथवा प्लॅस्टिकचे ड्रम विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असे एका विक्रेत्यांनी सांगितले.
सण-उत्सवांमुळे पाण्याची मागणी वाढली
सध्या मावळ तालुक्यातील शहरी भागात अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे, तर काही शहरांत दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. सण उत्सव, जत्रा यात्रांचा हंगाम सुरू असल्याने व उन्हाळ्यात पाण्याची जास्त गरज असल्याने नागरिकांकडून पाणी साठवणुकीचा पर्याय स्वीकारला जात आहे. किमान दोन दिवस पुरेल एवढा जलसाठा साठवून ठेवण्यासाठी तीनशे, पाचशे, हजार लिटर पाण्याच्या टाक्या नागरिक खरेदी करीत आहेत.





