प्रभात वृत्तसेवा पिंपरी – सार्वजनिक ठिकाणी उभे राहून हातवारे व हावभाव करून ग्राहक बोलाविताना आढळलेल्या महिलेविरुद्ध पोलिसांच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. २६ डिसेंबर) रोजी सायंकाळी योगीराज चौक, दिघी परिसरात करण्यात आली. राणुवाई मळा, चाकण येथील एका ४२ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस हवालदार गणेश सिताराम कारोटे यांनी शुक्रवारी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर मूर्ती भांडार दुकानाजवळील रस्त्याच्या कडेला उभी राहून आरोपी महिला लैंगिक हावभाव करून, हाताने खुणा करत व शब्द उच्चारत ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडवू लागली. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होईल असे कृत्य केल्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास दिघी पोलीस करीत आहे.