Pimpri Crime | पेट्रोल पंपावर हिंसाचार ; सिगारेट पिण्यास मनाई केल्यामुळे चाकूहल्ला

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पेट्रोल पंपावर सिगारेट पिण्यास मनाई केल्यामुळे दुचाकीवरून आलेल्या तिघांनी चाकूने वार करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. ०८) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ताथवडे येथील पेट्रोल पंपावर घडली.सौरभ ज्ञानेश्वर खंडाळकर (वय २५, रा. सुदर्शन कॉलनी, वाकड), विहान (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही, वय अंदाजे २२) आणि त्यांचा साथीदार (नाव, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल बाळासाहेब नवले (वय ३८, रा. नवले वस्ती, ताथवडे) असे जखमीचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. ९) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ श्रीधर नवले पेट्रोल पंपाजवळ बसला असताना, पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींना सिगारेट पिण्यास मनाई केली. याचा राग मनात धरून आरोपी सौरभ खंडाळकरने मोटारसायकलने पेट्रोल पंपावरील कामगार प्रसाद फटाटे यास धडक देऊन पाडले. मदतीला आलेल्या फिर्यादी, त्यांचा चुलत भाऊ श्रीधर नवले आणि पेट्रोलपंप कामगार गणेश जगताप यांना तीन आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने वार केले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले, श्रीधर नवले यांच्या छातीत वार झाला आणि गणेश जगताप यांच्या पाठीवर व हातावर वार करून त्यासही गंभीर दुखापत केली. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.



